Oppenheimer Review : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानला नमवण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला आणि संपूर्ण जगभरात एकच खळबळ माजली. या अमुबॉम्बमुळे जपानला शरणागती पत्करावी लागली. जपानी नागरिकांच्या अनेक पिढ्या या अणुबॉम्बमुळे उद्धवस्त झाल्या. संपूर्ण जगात अमेरिकेची ताकद मान्य करण्यात आली आणि अमेरिका शक्तीशाली देशांच्या रांगेत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला. केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण जगातील आजच्या पिढीलाही हिरोशिमा, नागासाकी आणि अणुबॉम्ब ठाऊक आहे. दुसऱ्या महायुद्धात टाकण्यात आलेला हा महाविध्वंसक अणुबॉम्ब जगाची दिशा बदलणारा ठरला आणि आजही अणुबॉम्ब ज्या देशाकडे आहे तो देश शक्तीशाली मानला जातो.
मात्र या अणुबॉम्बची रचना ज्याने केली त्याचे नाव फार कमी लोकांना ठाऊक होते. हॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानने (Christopher Nolan) त्या शास्त्रज्ञाचा अनेकांना माहित नसलेला इतिहास अतिशय भव्यतेने आणि रोमांचक, रंजक पद्धतीने पडद्यावर मांडलेला आहे. या अणुबॉम्बच्या जनकाचे नाव आहे रॉबर्ट ओपनहायमर. ओपनहायमर एक प्रख्यात शास्त्रज्ञ. अणुबॉम्बच्या निर्मितीच्या कल्पनेने झपाटलेला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर हल्ला करण्यासाठी या अणुबॉम्बचा वापर केला जावा असे त्याला वाटत असते.
चित्रपटाची सुरुवात ओपनहायमरच्या (Oppenheimer) चौकशीने सुरु होते. आणि ओपनहायमरच्या जीवनातील जीवनातील वेगवेगळे टप्पे आपल्यासमोर येतात. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून रहस्यमय चित्रपटाच्या पद्धतीने नोलान ओपनहायमरची कथा पडद्यावर उलगडत जातो. ओपनहायमर अणुबॉम्ब का बनवतो, मात्र नंतर त्याचे मतपरिवर्तन कसे होते, त्याचे कौटुंबिक जीवन कसे होते आणि एकेकाळी सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेला ओपनहायमर खलनायक कसा होतो आणि त्याचे खलनायकत्व सिद्ध करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कशी राबते हे हे अत्यंत प्रखरपणे आपल्यासमोर येते.
चित्रपटात दोन वेळा ओपनहायमर आणि प्रख्य़ात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांची दोन वेळा भेट होत असल्याचे दाखवले आहे. या दोघांमधील एका भेटीचे गूढ शेवटच्या काही मिनिटात उलगडते आणि अमेरिकेचे खरे रूपही या दोघांच्या भेटीतील संवादा दरम्यान उलगडते. अणुबॉम्बचा जनक असलेल्या ओपनहायमरचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा होता हे नोलानने अत्यंत प्रखरपणे पडद्यावर मांडले आहे.
तीन तासांचा हा चित्रपट एक रोलरकोस्टर आहे. पडद्यापासून जराही नजर दूर करून पाहू शकत नाही. एक जरी फ्रेम चुकली तरी तुम्हाला कथा समजण्यात अडचण येऊ शकते. आणि दुसऱ्यांदा तुम्हाला चित्रपट पाहावा लागू शकते. नोलानच्या चित्रपटांची हीच खासियत असते. एखादा चित्रपट तयार करण्यापूर्वी त्याची प्रत्येक फ्रेम नोलानच्या डोक्यात फिट बसलेली असते आणि अगदी त्या फ्रेमनुसारच तो चित्रपट चित्रित करतो. काही काही दृश्य तर अंगावर येतात. बॉम्बस्फोटाचे दृश्य कमालीचे आहे. नोलानने या चित्रपटासाठी कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर न करता खरा स्फोट घडवल्याचे सांगितले जाते. पडद्यावर ते दृश्य पाहाताना तसे वाटतेही. पण कधी कधी प्रमोशनसाठी अशा बातम्या प्रसारित केल्या जातात. त्यामुळे हे दृश्य नक्की कसे आहे ते ठाऊक नसले तरी ते अंगावर येते. ख्रिस्तोफर नोलानने यापूर्वी बॅटमनची द डार्क नाईट सीरीजपासून मोमेंटो, इन्सेप्शन, इंटरस्टेलर, डंकर्क, टेनेट असे एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. ओपनहायमरमुळे नोलानच्या चित्रपटाच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.
ओपनहायमर बघताना तो अभिनेता सिलियन मर्फी (Cillian Murphy) आहे असे वाटतच नाही. असे वाटते की ओपनहायमरलाच आपण पडद्यावर बघत आहोत. इतका सिलियन मर्फी ओपनहायमरच्या भूमिकेत समरस झालेला आहे. मर्फी ओपनहायमरची भूमिका अक्षरशः जगलाय. ओपनहायमरच्या भूमिकेसाठी नोलानने सिलियनची निवड करून मोठे यश मिळवले आहे. सिलियन मर्फीला यंदाचा ऑस्कर मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही.
आयरन मॅन रॉबर्ट डाऊनी ज्यूनियरने लुई स्ट्रॉसची थंड डोक्याच्या राजकारण्याची भूमिका खूपच चांगल्या पद्धतीने साकारली आहे. त्यालाही यंदाचे अनेक पुरस्कार मिळतील असे वाटते. ओपनगहायमरच्या पत्नीची भूमिका एमिली ब्लंटने खूपच उत्कृष्टरित्या साकारली आहे.
जर तुम्ही चांगल्या चित्रपटाचे आणि नोलानचे चाहते असाल तर 'ओपेनहाइमर' (Oppenheimer) हा चित्रपट चुकवू नका. आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये पाहायला मिळाला तर अवश्य पाहा. त्याची एक वेगळीच मजा आहे.