Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. आता साखरपुड्याच्या तयारीचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


स्वानंदीच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी


स्वानंदीने सोशल मीडियावर आशिष कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे. तसेच ती होणारा पती आशिषच्या गालावर किस करताना दिसत आहे. फोटोमध्ये स्वानंदी आणि आशिषने ट्रडिशनल आऊटफिट परिधान केलेले दिसत आहे. रोमॅंटिक फोटो शेअर करत स्वानंदीने कॅप्शन लिहिलं आहे,"आम्हाला जे हवं होतं तेच...". तसेच #EngagementMehendi #SwanandiAshish असे हॅशटॅगही तिने दिले आहेत. 






स्वानंदीने 20 जुलैला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत नात्याची जाहीर कबुली दिली होती. 'आमचं ठरलं' असं म्हणत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. आता स्वानंदीचा साखरपुडा होत असल्याने चाहतेही तिच्या आनंदात सहभागी झाले आहेत.


छोट्या पडदा गाजवलेली स्वानंदी


'दिल दोस्ती दुनियादारी' (Dil Dosti Duniyadari) या मालिकेच्या माध्यमातून स्वानंदीने मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. या मालिकेतील तिने साकारलेलं मिनलचं पात्र चांगलच गाजलं. त्यानंतर 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकेत ती झळकली. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई' या लोकप्रिय मालिकांमध्येही स्वानंदीने काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबत स्वानंदी एक उत्तम गायिकादेखील आहे. 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाची ती विजेती ठरली होती.


स्वानंदीच्या होणाऱ्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'


स्वानंदीचा होणारा पती अर्थात आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. 2008 साली 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. आशिषने 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.


संबंधित बातम्या


Swanandi Tikekar : स्वानंदी टिकेकरच्या होणाऱ्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'; जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल...