Nushrratt Bharuccha Akeli Movie Review : 'प्यार का पंचनामा' (Pyaar Ka Punchnama) सीरिज, 'सोनू के टीटू की स्वीटी' (Sonu Ke Titu Ki Sweety) आणि 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) सारख्या सुपरहिट सिनेमांचा भाग असलेली अभिनेत्री नुसरत भरुचाने (Nushrratt Bharuccha) आपल्या अभिनयाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. कौतुकास पात्र नाही अशी तिची एकही कलाकृती नाही. कोणत्याही गॉडफादर किंवा फिल्मी पार्श्वभूमीशिवाय मोठ्या पडद्यावर ठसा उमटवण्यासाठी तिने मेहनत घेतली. 


नुसरत भरुचाचा 'अकेली' (Akeli) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका तरुणीची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. जी एका भयंकर परिस्थितीत एकटीने संघर्ष करत आहे. नुसरतने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष केलाच आहे. पण या सिनेमातही वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच ती संघर्ष करताना दिसत आहे. 


दुसरीकडे, क्वीन' आणि 'कमांडो 3' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या प्रणय मेश्रामसाठी (Pranay Meshram) दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीतील ही पहिली मोठी झेप आहे. एकीकडे बॉक्स ऑफस 'गदर 2' (Gadar 2), 'जेलर' (Jailer),'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे धुमाकूळ घालत असताना 'अकेली' या सिनेमानंही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना संकटात अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी मदत केली होती तेव्हाचा काळ या सिनेमात दाखवण्यात आला आहे. इराकमधील तेव्हाची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. नुसरतने या सिनेमात ज्योती नामक पात्र साकारलं आहे. 


'अकेली' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Akeli Movie Story)


ज्योती या तरुणीने कर्ज फेडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. एका वृद्ध व्यक्तीची नोकरी वाचवण्यासाठी तिने देशातील नोकरीचा त्याग केला आहे. घरी ती मोसुल (इराक) ला जाताना मस्कतला जाण्याबद्दल सांगते. चांगल्या पगाराची हाव. ती मोसुलला पोहोचते पण काही दिवसांनी ISIS चा हल्ला होतो आणि इतर अनेक मुलींसोबत तिलाही दहशतवादी लोक घेऊन जातात. आता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाचा पाहावा लागेल.


'अकेली' हा सिनेमा कथानकाच्या दृष्टीने धाडसी प्रयोग आहे. प्रयोग यशस्वी किंवा अयशस्वी होऊ शकतात पण प्रयोग करत राहण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि या दृष्टीने नुसरत भरुचा आणि सिनेमाचे दिग्दर्शक प्रणय मेश्राम दोघेही कौतुकास पात्र आहेत. बई विमानतळावर प्रणयला सापडलेल्या एका अनामिक मुलीची ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. 


प्रणय आणि गुंजन सक्सेना यांनी मिळून 'अकेली' या सिनेमाची कथा लिहिली आहे. सिनेमाची पटकथा आपला वेग कायम ठेवणारी आहे. सिनेमेट्रोग्राफी उत्तम आहे. पण एडिटिंग आणि संगीतात गोंधळ वाटतो. 'छोरी' आणि 'जनहित में जरी' यांसारख्या सिनेमांमध्ये आपली क्षमता दाखविणाऱ्या नुसरतच्या करिअरमधील 'अकेली' हा सिनेमाही मैलाचा दगड आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचं काय होईल हे सांगणं कठीण आहे. 'गदर 2'च्या झंझावातामध्ये नुसरतचा दर्देदार अभिनय पाहण्याजोगा आहे.