Movie Review:  जर कोणती मुलगी नाही म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच होतो, हा एक संदेश 'सत्य प्रेम की कथा' (Satya Prem Ki katha) या चित्रपटामधून देण्यात आला आहे. तसेच बलात्कार हा मुलींच्या छोट्या कपड्यांमुळे नाही तर वाईट विचारांमुळे होता हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. ही गोष्ट सत्तू म्हणजेच सत्य प्रेम याची आहे. हे पात्र कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याने साकारले आहे. तो कायद्याच्या अभ्यासात नापास झालेला असतो आणि त्याच्या घरच्यांना त्याचं लग्न लावून द्यायचं असतं. तर कथा हिचं पात्र कियारा अडवानी (Kiara Advani) हिने साकारलं आहे. ती एका श्रीमंत कुटुंबातली असते. पण तिच्या प्रियकराने तिला फसवलेलं असतं. सत्य प्रेम म्हणजे कार्तिक हा कथा म्हणजेच कियाराच्या प्रेमात पडतो. पण कथाच्या मर्जीशिवाय तिचं लग्न सत्य प्रेम सोबत लावण्यात येतं. त्यानंतर एक असं रहस्य उलघडतं ज्यामुळे या दोघांच्या आयुष्यात वादळ येतं. त्यामुळे सत्य प्रेम आणि कथा यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहू शकता. 


या चित्रपटामध्ये कार्तिकने त्याच्या भूमिकेला हवा तो न्याय दिल्याचं पाहायला मिळतं. तसचं त्याने अस्खलित गुजराती भाषा बोलल्याचं पाहायला मिळतं. कार्तिक या चित्रपटामध्ये दिसण्याच्या स्पर्धेमध्ये देखील अव्वल ठरला आहे. कियाराने देखील तिच्या पात्राच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तर तिचा स्क्रिनवरचा वावर देखील चांगला राहिला आहे. तिने देखील अस्खलित गुजराती भाषेचा वापर केला आहे. कार्तिकच्या आई वडिलांची भूमिका गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांनी निभावली आहे. राजपाल यादव यांची छोटी भूमिका देखील लक्षवेधी ठरली असल्याचं या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आहे. 


हा एक रोमॅन्टीक चित्रपट असून या चित्रपटामधून एक चांगला संदेश देखील देण्यात आला आहे. चित्रपटचा ट्रेलर पाहून या चित्रपटामध्ये हा देखील संदेश देण्यात आला असेल असं वाटलं नव्हतं. परंतु या चित्रपटाची गोष्ट तुम्हाला पूर्ण चित्रपट पाहिल्या शिवाय कळणार नाही. या गोष्टीला अनेक वळणं येतात. ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की इथे आता काही वेगळं होणार आहे तिथे दुसरचं काहीतरी होतं. कार्तिक आणि कियाराच्या चाहत्यांना त्या दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाल्याचं चित्र सध्या आहे. पण हा चित्रपट कुटुंबासोबत पाहणं देखील चांगलं आहे. कारण या चित्रपटामध्ये देण्यात आलेला संदेश हा प्रत्येक कुटुंबाबपर्यंत पोहचायला हवा. 


समीर विध्वंस याने या चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले केले आहे. पण तो अजून चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी पार पाडू शकला असता. हितेश सोनिक यांनी या चित्रपटाला संगीत बद्ध केलं आहे. परंतु यामधील गाणी तितकी हवीहवीशी नाहीत. त्यामुळे आम्ही या चित्रपटाला देतोय साडे तीन स्टार.