Rocketry The Nambi Effect Review : Rocketry! या चित्रपटाला भारतीय जेष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायणन (Nambi Narayanan) यांच्या जीवनावर आधारित माहितीपट म्हणता येईल. ध्येयाने झपाटलेल्या माणसांचा संघर्षही त्या यानाप्रमाणेच असतो, हे या चित्रपटातून तंतोतंत उलगडून दाखवलं आहे. ध्येयाने झपाटलेल्या नम्बी नारायणन या भारतीय वैज्ञानिकाचा प्रवास उलगडून दाखवत असताना, चित्रपट ISRO च्या संघर्षकथेबद्दलही बोलून जातो. देशासाठी सर्वस्व पणाला लावून आपलं आयुष्य त्यागणाऱ्या एका अपरिचित नायकाला सन्मानित करण्याचा दखल घेण्याजोगा प्रयत्न म्हणजे Rocketry!


चित्रपटाची सुरुवात ही एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रसंग दाखवून होते अन् पुढच्याच क्षणी होत्याचं नव्हतं झाल्याचे प्रसंग दाखवले गेले आहेत. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.


नम्बी नारायणन यांचा प्रवास दाखवत असताना ISRO चा प्रवासही सुरू होतो. एका हॉलमध्ये सुरू झालेली ISRO ही आजघडीला जगातील अग्रेसर स्पेस रिसर्च संस्थेपैकी एक आहे. यामध्ये नम्बी नारायणन अन् त्यांच्यासारख्या अनेक अनसंग हिरोंचा वाटा आहे, हेदेखील चित्रपटातून अधोरेखित होतं. त्यामुळे चित्रपट केवळ नारायणन यांचाच प्रवास न राहता भारतीय वैज्ञानिक, संशोधक यांच्याही जिद्दीला जगासमोर आणणारा आहे. चित्रपटात विक्रम साराभाई, अब्दुल कलाम, सतीश धवन इत्यादींचे प्रसंग अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. त्यादरम्यान देशात-जगात घडणारी राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे हीसुद्धा नारायणन यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी ठरली असल्याचंही जाणीवपूर्वक मांडण्यात आलं आहे.


मध्यंतरापर्यंत चित्रपट शात्रज्ञांच्या, वैज्ञानिकांच्या मेहनतीतून उभ्या राहणाऱ्या ISRO चा रोचक इतिहास सांगतो आणि मध्यंतरानंतर मुख्य कथानकाला सुरुवात होते. देशद्रोही, गद्दार नम्बी नारायणन अशा आरोपांचा भडिमार सुरू होतो. यानाने एकाएकी आपली कक्षा सोडून क्रॅश व्हावं, तसं एकाएकी नारायणन यांचं आयुष्य क्रॅश होऊ लागतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्र, ISRO अंतर्गत असलेली स्पर्धा, स्थानिक पातळीवर असलेलं राजकारण या सगळ्यात नारायणन गुरफटले जातात. ज्या व्यक्तीने NASA ची लाखोंची नोकरी सोडून ISRO मध्ये राहण्याचा निर्णय घेतला, अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालतो अन् त्याच्या बाजूने उभं राहणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक असते, हे आपल्या मानवी संस्कृतीमधील कोरडेपणा सिद्ध करणारं आहेच, शिवाय व्यवस्थेची नाचक्की सुद्धा आहे. याच प्रसंगात चित्रपटाची कथा अतिशय टोकदार होते अन् प्रेक्षक आपोआप स्तब्ध होतो.


चित्रपटात कुठलेही प्रसंग ओढून ताणून आणि अतिरंजित वाटत नाहीत. जुना काळ आणि परदेशातील प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले आहेत. एखाद्या कलाकृतीला जसा हळूहळू आकार दिला जातो, तसा हा चित्रपट हळूहळू पुढे सरकत जातो आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचतो. चित्रपटात रॉकेट विज्ञान संदर्भात काही क्लिष्ट संवाद आहेत, जे सामान्यांना समजण्यापलीकडे आहेत. पण, त्यामुळे कथेशी लिंक तुटते असं नाही. चित्रपट अर्थातच नारायणन यांच्याबद्दल असल्याने प्रत्येक फ्रेममध्ये ते आहेत. कदाचित काही बाबी उलगडून दाखवताना दिग्दर्शक अजून कौशल्य दाखवू शकला असता, पण सत्य घटनेवर आधारित प्रसंगांची उभारणी करताना कदाचित काही मर्यादा आल्या असाव्यात. याचा अर्थ इतकाच की, चित्रपटाची मांडणी अजून रोचक पद्धतीने करता आली असती.


बाकी माधवनने सर्वस्व पणाला लावून चित्रपट साकारला आहे, असं म्हणता येईल. अभिनयाची कमाल आहेच, पण तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट परिपूर्ण आहे. कुठेही कमीपणा दाखवायला जागा नाही. एकंदरीत, Rocketry हा चित्रपट पाहणे वेगळा अनुभव आहे. तो केवळ चित्रपट किंवा ट्रॅजेडी नाही, तर यशस्वी अन् मोठ्या संस्था मोठ्या होण्यामागे अनेकांची आयुष्य खर्ची पडलेली असतात. स्वप्नांच्या मागे धावत असताना वास्तवाची धग ही सोसावी लागतेच. जिथे चांगलं-वाईट काही नाही, तिथे ध्येयवाद किंवा मानवी स्पर्धा समाजात कंदन माजवत असतात. बाजू सत्याची असो की असत्याची, ती पटलावर मांडायची संधी मिळाली पाहिजे. जोपर्यंत सूर्याची किरणे परावर्तित होत नाहीत, तोपर्यंत अंधकार आहे. त्यामुळे ही घटना चित्रपटाच्या स्वरूपात सर्वांसमोर येणं हे गरजेचं होतं. ते एका चांगल्या कलाकृतीच्या माध्यमातून समोर येत आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. संवेदनशील मनाला अन् देशाभिमानी विचारांना गती देणारा चित्रपट म्हणून ‘Rocketry’ची नोंद घेणं आवश्यक आहे.