Maharashtra Shahir : अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा सांगीतिक नजराणा आहे. शाहीर सांबळेंच्या गाण्यातले सूर आणि प्रत्यक्ष आयुष्यातले सूर यांची सांगड घालून गुंफलेली गुंतवून ठेवणारी गोष्ट आहे. या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे याची पटकथा. बायोपिकमध्ये दाखवण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि लेखक-दिग्दर्शक त्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता खूप जास्त असते. केदारने मात्र इथं स्मार्ट गेम खेळला आहे. शाहीर साबळेंच्या आयुष्यातले जास्तीत जास्त प्रसंग रंगवताना गोष्ट रेंगाळणार नाही याची खबरदारी घेतली आहे. अर्थात त्याचं श्रेय संगीतालाही तितकंच आहे. कारण गोष्टीचा वेग कायम राखण्यात संगीत मोठी जबाबदारी पार पाडतं. 


बायोपिकमध्ये साधारणपणे फ्लॅशबॅक तंत्र वापरलं जातं. केदारनेही भूत-वर्तमानाची सांगड घालत त्याच तंत्राचा वापर केला आहे. सिनेमा कथनात्मक असल्यानं काय दाखवायचं आणि काय फक्त सांगायचं याचं स्वातंत्र्य दिग्दर्शकाला मिळालं आहे. 


सिनेमाची पटकथेइतकीच मोठी जमेची बाजू अर्थातच अजय-अतुल यांचं संगीत. 'गाऊ नको किस्ना' किंवा मग 'मधुमास' या दोन गाण्यांना आधीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. सिनेमाचा भाग म्हणून पाहाताना त्याची रंगत आणखी खुलते. या नव्या गाण्यांइतकीच किंबहुना त्याहून जास्त महत्वाची आहेत ती शाहीर साबळेंची मूळ गाणी. ती गाणी नव्याने घडवताना त्यांच्या आत्म्याला धक्का न लावू देता त्यांचं सौंदर्य खुलवण्याचं काम अजय-अतुल जोडीने केलं आहे. तो काळ, त्या काळातील वाद्ये आणि शाहीर साबळेंच्या आवाजातील सहजता जपत जन्मलेली गाणी सिनेमाचा सोहळा करतात.  


अंकुश चौधरी या सिनेमाचा कणा आहे आणि त्यानेही या भूमिकाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. टिपिकल हिरोवाल्या प्रतिमेतून बाहेर येत त्यानं स्वत:लाच चॅलेंज केलं आहे. प्रेक्षकांनी आपल्याकडे शाहीर साबळे म्हणूनच पाहावं यासाठी त्यानं घेतलेली मेहनत जाणवते. सनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. तरीही अजून उत्तम कामाची अपेक्षा होती. 


 जमेच्या गोष्टी असल्या तरी काही खटकणाऱ्या बाबी नक्कीच आहेत. पहिलं म्हणजे यातला चकचकीतपणा. उत्तम निर्मितीमुल्यं म्हणजे चकचकीतपणा नव्हे. त्यातला ‘रॉ’नेस दिसणं आवश्यक होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शाहीर साबळेंचा आर्थिक संघर्ष केवळ संवादातून जाणवतो. जेव्हा शाहीर साबळे हे आपल्या घरातले शेवटचे दहा रुपये असं म्हणतात तेव्हा त्या फ्रेममध्ये ढासळलेली आर्थिक परिस्थिती जाणवत नाही.    


जेव्हा एखाद्या गोष्टीत 60-70 वर्षांचा काळ रेखाटला जातो. तेव्हा त्यातील पात्रांच्या लूक्सवर लक्ष देणं फार गरजेचं असतं. इथं हा सिनेमा कमी पडल्यासारखा वाटतो. साने गुरुजी, शाहीर साबळेंची आई, भानुमती, शाहीर साबळेंचे मित्र यांचे लूक्स लक्षात येण्याइतपत खटकतात. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर होणारे बदल दिसणं गरजेचं होतं.  


अर्थात अशा काही तांत्रिक गोष्टी असल्या तरी प्रेक्षक म्हणून तुम्हाला एक बहारदार अनुभव हा सिनेमा नक्कीच देईल. केदार शिंदे आणि टीमने खूप मेहनतीतून साकारलेली ही कलाकृती त्या महाराष्ट्र शाहीराला सलाम करण्यासाठी, त्यांच्या योगदानापुढे नतमस्तक होण्यासाठी नक्कीच पाहायला हवी. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.