Kartam Bhugtam Review : मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या 'करतम भुगतम' (Kartam Bhugtam) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. कोणाच्या मृत्यूची वेळ आणि तारीख कोणी सांगू शकेल? तुमचे अडकलेले पैसे कोणत्या दिवशी मिळतील हे तुम्हाला कोणी सांगू शकतं? पण असा दावा करणारे खूप लोक आहेत. 'करतम भुगतम' हा चित्रपट धर्म आणि अंधविश्वासाबद्दल भाष्य करणारा आहे. जसं काम कराल तसं त्याचं फळ मिळेल हे सांगणारा हा चित्रपट आहे. कोणत्याही उपायांनी तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, हे सांगणारा हा चित्रपट आहे.


'करतम भुगतम'चं कथानक काय? (Kartam Bhugtam Story)


'करतम भुगतम'ची गोष्ट आहे देव म्हणजे श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade). देव न्यूझीलँडमधून भोपाळला येतो. देव लहान असताना त्याच्या आईचं निधन होतं त्यानंतर वडीलांच्या छत्र छायेखाली तो लहानाचा मोठा होतो. आता वडीलांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. 10 दिवसांत प्रॉपर्टीचं काम संपवून तो विदेशातून परत येतो. पण काही कारणाने त्याचं काम अडकतं. नंतर त्याची भेट अन्ना म्हणजेच विजय राजसोबत होते. हा व्यक्ती त्याचा हात पाहून त्याची आणि त्याच्या आईची मृत्यूची तारीख सांगतो. पुढे काय होतं, अन्नाच्या माध्यमातून देवचं काम होतं? या कथानकात खूप हैरान करणारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहातच जावं लागेल.


'करतम भुगतम'कसा आहे?


'करतम भुगतम' या चित्रपटाची सुरुवात खूपच संथ आहे. प्रोडक्शन खालच्या पातळीचं वाटतं पण कथानकात दम आहे. उत्तमप्रकारे चित्रपटाची बांधणी करण्यात आलेली आहे. पहिल्या सीनपासून तुम्ही चित्रपटासोबत जोडले जातात. आता पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना सतत वाटते. अचानक प्रेक्षक विचारही करणार नाहीत अशी गोष्ट घडते. हैराण करणारे ट्विस्ट चित्रपटात येतात. त्यावेळी हा छोटा बजेट असलेला चित्रपट आहे याचा तुम्हाला विसर पडतो. फक्त तुम्ही एक चांगला चित्रपट पाहताय एवढंच तुमच्या डोक्यात असतं. शेवटापर्यंत चित्रपट तुम्हाला हैराण करतो. हा चित्रपट जाता जाता तुम्हाला खूप काही शिकवतो. 


श्रेयसचा दर्जेदार अभिनय


श्रेयस तळपदेने पुन्हा एकदा तो उत्कृष्ट अभिनेता आहे हे सिद्ध केलं आहे. देवचे वेगवेगळे रंग श्रेयसने उत्तमरित्या वठवले आहेत. देव या भूमिकेसाठी श्रेयसने घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना दिसून येते. श्रेयसने भूमिका चोख बजावली आहे. विजय राजची भूमिकादेखील जबरदस्त आहे. अन्नाच्या भूमिकेला त्याने 100% दिले आहेत. त्याच्या अभिनयाचंही कौतुक. मधुचं कामदेखील चांगलं झालं आहे. अक्षा पारदसानीनेदेखील चांगला अभिनय केला आहे. 


सोहम शाहने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कमी बजेट असूनही कथानक आणि दिग्दर्शन उत्तम झालं आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा संपूर्ण चित्रपट आहे. 'कंटेंट इज किंग' हे सोहमने सिद्ध केलं आहे. एकंदरीतच हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना मजा येईल.