Criminal Justice Season 4 :   कोर्टरुममध्ये  आणि त्याच्या बाहेरच्या जगातील घडामोडी दाखवणाऱ्या 'क्रिमिनल जस्टीस' या वेब सीरिजचा चौथा सीझन (Criminal Justice Season 4) आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या चौथ्या सीझनमध्ये अ‍ॅड. माधव मिश्रा आता कोणती नवीन केस सोडवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 


क्रिमिनल जस्टीस या वेब सीरिजमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी अ‍ॅड. माधव मिश्रा ही भू्मिका साकारली आहे. सहजसुंदर अभिनयामुळे पंकज यांनी साकारलेल्या माधवने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. कोर्टरुम ड्रामामध्ये ऑन स्क्रिन वकिलांची भूमिका सशक्तपणे साकारलेल्या अभिनेत्यांच्या यादीत पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे. 


पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, अ‍ॅड. माधव मिश्राच्या व्यक्तीरेखेसोबत एक बंध तयार झाले आहे. त्याचा प्रत्येक विजय हा माझा विजय वाटत आला आहे. त्याची झालेली पिछेहाट ही माझी पिछेहाट वाटत आली असल्याचे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले. या चौथ्या सीझनमध्येही माधव मिश्रादेखील एका कठीण प्रकरणाला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. 







या वेब सीरिजचे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे आणि बीबीसी स्टुडिओच्या सहकार्याने ॲप्लॉज एंटरटेनमेंटने निर्मिती केली आहे.





ॲप्लॉज एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक समीर नायर यांनी सांगितले की, " क्रिमिनल जस्टिसच्या प्रत्येक सीझनमध्ये नैतिकता, न्यायाच्या जटिल पेचांना आव्हान देणारे प्रकरण होते. आता पुढील सीझनही आतापर्यंतच्या उंचीचा पुढील टप्पा गाठणार असणार असल्याचे त्यांनी म्हटले. 


क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सीझन कधी रिलीज होणार याची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाही.  याआधीच्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.  या तिन्ही सीझनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांची प्रकरणे समोर आली होती.