Hanuman Movie Review : काल खरे तर श्रीराम राघवनचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) पाहायला गेलो होतो. पण ज्या मल्टीप्लेक्सला गेलो तेथे तिकीट मिळाले नाही. मात्र हनुमानचे तिकिट मिळत होते. हनुमान (Hanuman) हा साऊथचा चित्रपट असल्याने आणि साउथच्या निर्माता-दिग्दर्शकांबद्दल मला जरा जास्त प्रेम असल्याने हनुमान पाहाण्याचा निर्णय घेतला आणि आपला निर्णय योग्य असल्याचे जाणवले. चित्रपट पाहिल्यानंतर हिंदीवाले असे प्रयोग इतक्या सशक्त पद्धतीने का करू शकत नाहीत असा प्रश्न पुन्हा एकदा पडला.


हॉलिवूडने अनेक सुपरहीरो पडद्यावर आणले आणि त्यांनी लहानथोरांसह सगळ्यांच्याच मनावर गारुड केले आणि आजही त्यांचं गारुड कायम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने सुपरहीरो पडद्यावर आणण्याचा प्रयत्न अधे मधे केला पण पुढे तो प्रयोग सतत सुरु ठेवला नाही. मि. इंडियापासून अनेक सुपरहीरो पडद्यावर आले, क्रिशने तो प्रयोग आणखी पुढे नेला आणि बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. क्रिशचे तीन भाग आले मात्र चौथा भाग अजूनही तयार होऊ शकलेला नाही. राकेश रोशन आणि ऋतिक रोशन गेल्या दोन वर्षांपासून क्रिशच्या पुढील भागाबाबत सूतोवाच केले होते पण अजूनही काहीही झालेले नाही. आता एवढे सगळे रामायण सांगायचे कारण  हनुमान चित्रपट. 'हनुमान' हा सुपरहीरो आता जगावर राज्य करण्यास तयार झाला असून याचे अनेक भाग काढण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा आहे आणि त्यांचा हा पहिला 'हनुमान' पाहताना ते त्यांच्या या मोहिमेत नक्की यशस्वी होतील यात शंका नाही.


पौराणिक आणि आधुनिकतेचा संगम 'हनुमान'


हनुमानाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. हनुमानाची शक्ती ठाऊक आहे.  मात्र हनुमानाची शक्ती ही फक्त पौराणिक चित्रपटांमध्येच दिसून येत होती. मात्र प्रशांत वर्मा यांनी याच हनुमानाला पौराणिक आणि आधुनिकतेचा संगम घडवत पडद्यावर आणले आहे आणि तो यात बऱ्यापैकी यशस्वीही झाला आहे. चित्रपटाची सुरुवात खलनायकाच्या जन्माने होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत खलनायक पुढे येतो. या खलनायकाला सुपरहीरो व्हायचे होते आणि यासाठी तो त्याच्या या मोहिमेमध्ये येणाऱ्या सगळ्यांचा खात्मा करतो, मग यात तो अगदी आपल्या पालकांचीही हत्या करतो. या खलनायकाचे नाव माइकल. 


'हनुमान'चं कथानक काय? (Hanuman Movie Story)


इंद्राच्या वज्राने हनुमानाच्या हनुवटीला जखम होते आणि त्याच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर कुठे तरी एका नदीत पडतो आणि त्याचा रुद्रमणी होतो. या रुद्रमणीत प्रचंड ताकद असते. अशी कथा पुढे घेऊन आपण थेट जातो ते अंजनाद्री नावाच्या एका गावात. या ठिकाणी हनुमंत (तेज सज्जा) नावाचा एक गरीब तरुण आपल्या मोठ्या बहिणीबरोबर राहात असतो. गावात उनाडक्या करीत फिरणे हाच त्याचा उद्योग असतो. लहानपणी त्याचे एका मुलीवर मीनाक्षीवर (अमृता अय्यर)वर प्रेम असते. ती डॉक्टर होऊन गावात परतते. याच मिनाक्षीला गावातील गुंडाच्या तावडीतून सोडवण्याचा हनुमंत प्रयत्न करतो आणि त्या गुंडांच्या मारहाणीमुळे तो नदीत पडतो, तेथे त्याच्या हाताला रुद्रमणी लागतो. त्या रुद्रमणीमुळे त्याच्याच शक्ती येते. ती कशी येते आणि त्याची त्याला जाणीव कशी होते ते पडद्यावर पाहाण्यासारखे आहे. चित्रपट पाहाताना तुम्हाला क्रिशची आठवण येऊ शकते.


माइकलला हनुमंताकडे असलेल्या दैवी शक्तीची माहिती मिळते आणि तो ती दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी अंजनाद्री गावात येतो. आणि पुढे नेहमीप्रमाणेच नायक-खलनायकात मारामारी आणि सत्याचा विजय. मात्र हा सगळा प्रवास प्रशांत वर्माने अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर मांडलेला आहे. चित्रपटाची कथा त्यानेच लिहिली असून पौराणिक कथेला त्याने अधुनिकतेची जोड अत्यंत उत्कृष्टरित्या दिलेली आहे. प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन होईल याची त्याने चित्रपट तयार करताना खूपच काळजी घेतली आहे आणि तो यात यशस्वी झालेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


आपण बघतो काही हिंदी चित्रपट स्पशेल इफेक्ट्सवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे सांगतात, मात्र ते स्पेशल इफेक्ट्स अत्यंत बालिश असल्याचे चित्रपट पाहाताना जाणवते. उदा. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष. मात्र अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या हनुमान चित्रपटाचे स्पेशल इफेक्टस खूपच चांगले झाले असल्याचे पडद्यावर दिसून येते. त्यामुळेच चित्रपट आणखी आकर्षक वाटला आहे.


कलाकारांच्या अभिनयाची कमाल


तेजा सज्जाने हनुमंताची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. खरे तर त्याचा चेहरा रोमांटिक नायकाच्या भूमिकेला साजेसा आहे पण यात त्याने रोमांस आणि अॅक्शन दोन्ही चांगल्या प्रकारे सादर केले आहे. अमृता अय्यरने मीनाक्षीच्या भूमिकेत नायिकेचा भाग पूर्ण केला आहे. तिच्या अभिनयाची विशेष प्रशंसा करावी असे काही नाही. माइकलच्या भूमिकेत विनय रायने बऱ्यापैकी काम केले आहे. हनुमंताच्या मोठ्या बहिणीची अंजम्माची भूमिका वरलक्ष्मी शरतकुमारने खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे.दिग्दर्शक प्रशांत वर्माने तिचा चित्रपटात पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. तिची भूमिका लक्षात राहाते.


'हनुमान' कसा आहे?


साऊथचा चित्रपट असला तरी तो हिंदीमध्येही डब करून रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे हिंदी संवाद खूपच चांगले आहे. चित्रपटाला अनुदीप देव, गौरहरी आणि कृष्णा सौरभ यांनी संगीत दिले असून ते खूपच चांगले आहे. हिंदी भाषेतील गाणीही चांगली बनली आहेत.


एकूणच हनुमान त्याच्या स्पेशल इफेक्ट्स आणि पौराणिक, आधुनिक कथेच्या मिलनामुळे पाहाण्यासारखा झाला आहे. संपूर्ण परिवारासह हा चित्रपट पाहिला जाऊ शकतो. लहान मुलांना तर हा चित्रपट नक्कीच आवडेल. हनुनमानचा पुढील भाग 'जय हनुमान' नावाने 2025 मध्ये रिलीज होणार असल्याचेही चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहे.