Pankaj Tripathi on Mukesh Ambani : एक अभ्यासू अभिनेता अशी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची ओळख आहे. 'मिर्जापूर','गँग्स ऑफ वासेपूर' किंवा 'बरेली की बर्फी' आणि 'गुंजन सक्सेना' असो वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अभिनेते असते तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका मिळाली नसती, असं वक्तव्य पंकज त्रिपाठी यांनी केलं आहे. 


पंकज त्रिपाठी यांनी आजवर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. पण काहीच कलाकृतींमध्ये त्यांना श्रीमंत असलेलं पात्र साकारायला मिळालं आहे. पण संधी मिळाली तर श्रीमंत व्यक्तीच्या भूमिका करायला पंकज त्रिपाठी यांना नक्कीच आवडेल.


एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले,"सिनेमाने आपल्याला स्टीरियोटाइप केलं आहे. डॉक्टर असा दिसणं अपेक्षित आहे. इंजीनियर असा दिसला पाहिजे.  ज्युनियर आर्टिस्टच्या ऑडिशनसाठीही रिच लूक, कॉर्पोरेट लूक, अशा अटी ठेवण्यात येतात. कतरिना कैफचा आपण डॉक्टरच्या भूमिकेसाठी विचार करतो. पण तुम्ही दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जा. तिथे तुम्हाला किती कतरिना दिसतील?". 


"मुकेश अंबानी अभिनेते असते तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका मिळाली नसती" : पंकज त्रिपाठी


पंकज त्रिपाठी आणखी एक उदाहरण देत म्हणाले,"मुकेश अंबानी उद्योगपती नसते आणि अभिनेते असते असा विचार करा. एखाद्या कलाकृतीत श्रीमंत उद्योगपतीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता म्हणून मुकेश अंबांनींची निवड कधीच झाली नसती. लूक रिच वाटत नाही, असं सांगून त्यांना काढून टाकण्यात आलं असतं. रिच लूक काय असतो? ते आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत."


पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले,"सिनेमात एखाद्या भूमिकेचा खूप अभ्यास करुन त्याच्या लूकनुसार कलाकारांची निवड केली जाते. पण खऱ्या आयुष्यात तसं होत नाही. पोलीस कसा दिसतो, श्रीमंत व्यक्ती कसा दिसतो? गरीब व्यक्ती कसा असतो? अशा अनेक चौकटी घालण्यात आल्या आहेत. पण समाजात असं होत नाही". 


पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज


'मैं अटल हूं' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधवने सांभाळली आहे. तर ऋषी विरमानु यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली आहे. 'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Main Atal Hoon : 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय'; पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूं'मधील नवं गाणं आऊट