Guthlee Ladoo Movie Review : संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा 'गुठली लड्डू' (Guthlee Ladoo) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण जात-धर्म या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती किती दिवस निर्माण होणार असा प्रश्न हा सिनेमा पाहताना पुन्हा एकदा उपस्थित झाला.


अनुसूचित जातीचा एक मुलगा वरचढ जातीच्या घरातील सायकलीला हात लावतो. त्यानंतर त्या मुलाला अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. साफसफाईचा मोबदला म्हणून वरचढ जातीची महिला त्याला 50 रुपये देते आणि 20 रुपये जबरदस्तीने त्याच्याकडून मागते. त्यानंतर अनुसूचित जातीचा मुलगा म्हणतो,"मी हात लावलेल्या पैशांना तुम्ही कसा हात लावणार". त्यावर वरचढ जातीची महिला म्हणते,"लक्ष्मी आहे ही लक्ष्मी...लक्ष्मीला चिखल लागला तरी तिची किंमत कमी होत नाही". 


आपल्या देशात जात, धर्म या गोष्टी किती वर्ष सुरू राहणार या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे. आपल्या देशात अनुसूचित जातीचा व्यक्ती मोठा अधिकारी झाला तर त्यांचं कौतुक केलं जातं. त्याला हात मिळवायला कोणाला काही समस्या नसते. पण जर त्याच जातीचा मुलगा जर साफसफाई करत असेल तर त्याला हात लावायला लोकांना प्रोब्लेम असतो. पण जात-धर्म या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती किती दिवस निर्माण होणार असा प्रश्न हा सिनेमा पाहताना पुन्हा एकदा उपस्थित झाला. 


'गुठली लड्डू' सिनेमाचं कथानक काय? (Guthlee Ladoo Movie Story)


'गुठली लड्डू' हा सिनेमा अनुसूचित जातीती गुठली आणि लड्डू नामक दोन मुलांवर आधारित आहे. या मुलांचे पालक साफसफाई करण्याचं काम करतात. गुठलीला शिक्षणाची आवड आहे. अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याने त्याला शिक्षण घ्यायचं आहे. पण अनुसूचित जातीचा असल्यामुळे त्याला शाळेत प्रवेश मिळत नाही. शाळेचे मुख्याध्यापक आणि गुठलीचे वडील त्याने शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न करतात. पण त्यानंतरही त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गुठलीला शाळेत प्रवेश मिळणार का? अनुसूचित जातीच्या विद्यार्थासोबत वरचढ जातीचा विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो का? या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला भाग पाडेल.


'गुठली लड्डू' कसा आहे? 


'गुठली लड्डू ' या सिनेमात संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पैसे कमावणं आणि शिक्षण या गोष्टींवर वरचढ जात असलेल्यांचा अधिकार आहे का? असे अनेक प्रश्न हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना पडतात. सिनेमातील एका दृश्यात गुठली त्याच्या आईला म्हणतो,"आई, मिठाईवाल्याचा मुलगादेखील आपल्या घराची स्वच्छता करतो. त्यामुळे तोही आपल्याच जातीचा झाला ना..". त्यावर त्याची आई म्हणते,"तो फक्त त्याची घराची साफसफाई करतो आणि आपण दुसऱ्यांच्या". त्यावर गुठली म्हणतो,"म्हणजेच मिठाई वाल्याचा मुलगा घरात आपल्या जातीचा असतो आणि बाहेर वावरताना वरचढ जातीचा". सिनेमातील हे संवाद तुमचं लक्ष वेधून घेतात. अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत सिनेमा पुढे सरकतो. 


संजय मिश्रा एक उत्तम अभिनेते आहेत. प्रत्येक भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. त्यांच्या दर्देजार अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आलं आहे. लड्डूची भूमिका हीत शर्माने साकारली आहे. तर गुठलीच्या भूमिकेत धनय सेठ आहे. एकंदरीतच सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगले काम केले आहे. 


'गुठली लड्डू ' हा भव्यदिव्य सिनेमा नाही. या सिनेमात कोणत्याही प्रकारचं ग्लॅमर नाही. पण अशा पद्धतीचे सिनेमे का बनवावे लागतात? असा प्रश्न सिनेमा पाहताना वारंवार पडतो. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला तरी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा सिनेमा एकदा तरी नक्की पाहावा...