Gabh Marathi Movie Review :  प्रेम कथा आणि त्याभोवती असलेली गोष्ट म्हटली की प्रेक्षकांच्या मनात एक साधारणपणे चित्रपटातील एक ठोकताळा येतो. नायक-नायिकेचे प्रेम, दोन-चार गाणी, प्रेम पूर्णत्वास नेण्यासाठी धडपड करणारे मित्र, प्रेमाच्या विरोधात असणारे खलनायक  असे सगळे चित्र डोळ्यासमोरून झरझर समोर येते. मात्र, रुपेरी पडद्यावरील प्रेम कथेची हीच चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न 'गाभ'च्या (Gabh) निमित्ताने दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. 


चित्रपटाची कथा काय? 


चित्रपटाची कथा ही प्रामुख्याने एका रेड्याभोवती फिरते. गावात तिशीत असणारा अविवाहित दादासाहेब उर्फ दादू हा आपल्या आजीसोबत राहत असतो. आपल्या घरी म्हैस असावी अशी आजीची इच्छा असते. आजीच्या पेन्शनमधून दादू एक म्हैस खरेदी करतो. खरंतर त्यांच्याकडे त्याआधी एक सगुणा नावाची म्हैस असते पण तिचा मृत्यू झाला असतो.  दादू हा गावातील सरपंचाकडे हिशोब ठेवण्याचे काम करत असतो.  त्याशिवाय, घरातील काही कामात आवश्यकता असेल तेव्हा ती कामे देखील करतो. या सरपंचाच्या घरातील म्हशीला रेडा लावण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. त्या गावात फुलवाकडेच रेडा असतो. त्यामुळे या रेड्याला मागणी असते. दादूस फुलवाला भेटतो आणि पुढील बोलणी करतो. मग पुढे अशा कोणत्या घटना घडत जातात की फुलवाला चक्क आपल्या रेड्यासोबत पळून जावे लागते?  दादूच्या आयुष्याला कोणत्या घटनेने कलाटणी मिळते? दादू-फुलवाचे प्रेम प्रकरण यशस्वी ठरते का? याची उत्तरे जाणून घ्यायला चित्रपट पाहावा लागेल. 


चित्रपटात काय आहे?


प्राणी आणि माणसांची आगळीवेगळी कथा म्हणून गाभ चित्रपट वेगळ भाष्य करतो. ग्रामीण भागात शेतकरी आणि प्राण्याचे एक खास नातं असते. या नात्याला केंद्रस्थानी ठेवत गाभ वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर भाष्य करतो. विकासाच्या जोरदार चर्चा सुरू असल्या तरी ग्रामीण भागातील एक वास्तव आपल्यसमोर मांडण्याचा प्रयत्न 'गाभ' करतो. वयाची तिशी आली तरी अविवाहित असलेल्या तरुणांना टोमणे-अवहेलनेला सामोरे जाणे, म्हशीसाठी इंजेक्शन न वापरता रेडा लावणे, त्यातून ग्रामीण भागातील समस्या समोर आणण्याचा  प्रयत्न करण्यात आला आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न, समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. शेतीमातीशी संबंधित असलेल्या या चित्रपटात  विनोदाचीही पेरणी आहे.


'गाभ' या चित्रपटात कलाकारांची उगाच भाऊगर्दी नाही. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्येकाच्या वाटेला आलेल्या भूमिका प्रत्येकाने चांगल्या  निभावल्या आहेत. कैलास वाघमारेने पडद्यावरील नायक म्हणून असलेली प्रस्थापित चौकट मोडण्याचा प्रयत्न आधीही केला आहे तोच प्रयत्न 'गाभ'मध्ये ही दिसतो. दादूची भूमिका ताकदीने साकारली आहे. माणूस आणि प्राणी यातील नातं, जिव्हाळा, प्रेम या भावनांना सामोरे जाताना दादूमध्ये  एक माणूस म्हणून बदल होत जातो. तर, सायली बांदकरने खंबीर, निडर असलेल्या फुलवाची भूमिका साकारली आहे. रंगभूमीवर छाप सोडणाऱ्या सायलीचा हा पहिलाच चित्रपट आहे. फुलवाचे व्यक्तीमत्व तिने चांगल्या प्रकारे उभं केले आहे. सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत विकास पाटीलने उभा जन्याही आपली सोडतो. 


चित्रपट हा एका प्रेम कथेभोवती असला तरी ती वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे. चित्रपटाची गती काहीशी संथ वाटते.  चित्रपटाची कथा शेतीमातीशी संबंधित असल्याने पूर्णत: शहरी असलेल्या प्रेक्षकांना किती आपलासा वाटेल याची शंकाच आहे. मात्र, मानवी संवेदनशीलतेमधून हा चित्रपट पाहिल्यास त्यातील भाव नक्कीच समजून येतील. 'गाभ' हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि असे प्रयत्न झाले पाहिजे.