Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मागील काही वर्षांपासून चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना  या व्यक्तीरेखेच्या नावाने ओळखले जाते. मात्र, त्याच वेळी ही मालिका कलाकार आणि निर्मात्यांमधील वादामुळेही चर्चेत राहिली आहे. काही कलाकारांनी वादातून मालिका सोडली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेनेतील कलाकारांनी शो सोडला. आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षानंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बालकलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या टप्पू सेनेतील टप्पू अर्थात भव्या गांधी, सोनू अर्थान झील मेहता यांनी या आधीच मालिका सोडली. आता आणखी एका कलाकाराने मालिकेला राम राम केला आहे. 'तारक मेहता का...' मध्ये गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह (Kush Shah) याने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू होती. आता कुशच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. 


कुश शाहने मालिका सोडली?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार गोली अर्थात कुश शाह हा न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमधील एका बीचवर वेळ घालवताना कुश शाह दिसला आहे. रेडिटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, एका चाहत्याने म्हटले की,   “स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या इथे जाताना न्यूयॉर्कमध्ये अचानक कुश भेटला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचे त्याने मला सांगितले”.


 






गोलीच्या चाहत्याची ही पोस्ट व्हायरल होत असून मालिकेच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले की,  मी गोली आणि जेठालाल यांची मस्ती एन्जॉय करत होतो, पण त्याच्यासाठी हे सगळं चांगले आहे. एकाने 'तारक मेहता...' मध्ये आता पूर्वीसारखी मजा येणार नसल्याचे सांगितले.  


कुश शाहने काय म्हटले?


दरम्यान, कुशने मालिका सोडल्याबाबत मालिकेच्या टीमकडून कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.  तर, 'न्यूज 18' सोबत बोलताना कुशने मालिका सोडली नसल्याचे म्हटले आणि अधिक भाष्य करण्यास नकार दिला.