Bheed Movie Review : तीन वर्षांपूर्वी देशात कोरोना महासाथीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर देशामध्ये सुरू असलेल्या श्रमिकांच्या स्थलांतर संपूर्ण देशाने पाहिले. होत असलेले स्थलांतर पाहून देशाने हळहळ व्यक्त केली होती. तर, काही स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला होता. या लॉकडाऊनमधील स्थलांतरात प्रत्येकाची एक गोष्ट होती. काही गोष्टी समोर आल्या, काही गोष्टी पडद्याआड राहिल्या. काही गोष्टींची फक्त लोकांनी कल्पनाच केली. या स्थलांतरात माणूस, त्याचा स्वभाव, त्याच्यावर परिणाम करणारे घटक आणि अनेक वर्षांपासून त्याच्या मनात रुजलेली एक वृत्ती यावर भीड नेमकंपणाने भाष्य करतो. 


'मुल्क', 'थप्पड', 'आर्टिकल 15', 'अनेक' या सारख्या वेगळ्या धाटणीच्या विषयावर चित्रपट देणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. भीड मध्ये माणसांची गर्दी आहे. या गर्दीत प्रत्येकाची एक गोष्ट आहे. प्रत्येकाला शहराबाहेर जायचे आहे. कोणाला आपल्या गावाकडे जायचे आहे, त्यासाठी धडपड सुरू आहे. तर, एका आईला आपल्या मुलीच्या हॉस्टेलवर जाऊन तिला पुन्हा घरी आणायचे आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांची गोष्ट 'भीड' आपल्याला सांगते. लॉकडाउनचा काळ हा देशातील बहुतांशी वर्गासाठी एक काळा अध्याय होता. कदाचित त्याची आठवण करून देण्यासाठी, लोकांच्या मनात अजून असलेल्या वाईट प्रवृत्तीवर भाष्य करण्यासाठी चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट प्रदर्शित झाला का, असे वाटणं स्वाभाविक आहे. 


चित्रपटाची गोष्ट सुरू होते, ती लॉकडाऊन लागू केल्यानंतर. शहरातून गावी जाण्यासाठी सुरू असलेली धडपड, लोकांमधील गोंधळ, सोशल मीडियावरून सुरू असलेल्या मेसेजचा भडिमार, समाजात असणारा जातीयवाद या सगळ्या मुद्यांवर हा चित्रपट पद्धतशीरपणे भाष्य करतो. 


लॉकडाउनमध्ये झालेले स्थलांतर हे स्वातंत्र्यानंतरच्या फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे म्हटले जाते. लॉकडाउन लागू केल्यानंतर अनेकजण विविध मार्गाने जमेल तसं दिल्लीतून बाहेर पडतात आणि तेजपूर नावाच्या गावाच्या सीमेवर येतात. ज्या ठिकाणी पोलीस सगळ्यांना अटकाव करतात. या ठिकाणी चित्रपटाची मुख्य कथा सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक सूर्याकुमार सिंह टिकस, प्रशिक्षणार्थी डॉक्टर रेणू शर्मा, पोलीस निरीक्षक यादव, राम सिंह, वॉचमन बलराम यादव, मुलीच्या घरी नेण्यासाठी तिच्या हॉस्टेलला जाण्याच्या प्रयत्नात असलेली गीतांजली आणि कार चालक कन्हैय्या यांच्याभोवती आणि त्याच्यांसोबत असलेल्या हजारो लोकांसोबत ही गोष्ट घडते.


चित्रपटात कसलेले कलाकार असल्याने अभिनय तोडीचा झाला आहे. राजकुमार राव, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, पंकज कपूर, आदित्य श्रीवास्तव यांच्या भूमिका कमाल झाल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेल्या लहान भूमिकांनादेखील न्याय दिला आहे.


रोजगारासाठी स्थलांतर करणे ही अनेक संधीच्या शोधासाठी केलेला प्रयत्न आहे असं म्हणतात. शहरात आल्यानंतर जाती काही प्रमाणात लुप्त होतात. त्याठिकाणी श्रमिक आणि मालक, श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग दिसून येतात. मात्र, ग्रामीण भागाकडे जात असताना या लुप्त झालेल्या जाती पुन्हा ठळकपणे समोर येतात. सवर्ण आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमधील संघर्षावर हा चित्रपट भाष्य करतो. कोरोना काळात सोशल मीडियावर झालेला अपप्रचार, फेक मेसेजमुळे लोकांची झालेली दिशाभूल यावरही दिग्दर्शक आपल्या पद्धतीने भाष्य करतो. तबलिगींमुळे कोरोना फैलावत असल्याचा मोठा अपप्रचार झाला होता. त्याशिवाय, सरकारकडून प्रशासनाकडून कसे प्रयत्न सुरू आहेत, याचेही अवाजवी दावे सोशल मीडियावर झाले होते. त्याच्यामुळे परिस्थिती कशी बिघडली यावर सूचकपणे भाष्य करण्यात आले. समाजातील जात, धर्म आणि वर्ग वास्तव दाखवण्याचा प्रयत्न होतो.


चित्रपटाचा नायक अस्पृश्य समाजातील सूर्यकुमार सिंह टिकस आहे. पोलीस दलाचा अधिकारी असला तरी समाजातील जातीयवाद त्याचा पाठलाग सोडत नाही. स्वत: च्या नातेवाईकांवर एका गावातील वरच्या जातीतील राजकीय प्रस्थापिताकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या वेळी तो हतबल असतो. लॉकडाऊनच्या वेळी त्याच्याकडे तेजपूर पोस्टची जबाबदारी येते. मात्र, सहकाऱ्यांकडून टोमणे, स्थलांतरीत कामगारांमधील त्रिवेदींनी दाखवलेली त्याला जात वास्तव हे प्रसंग विचार करायला लावणारे आहेत. चित्रपटातील संवाद दमदार झाले आहेत. हे संवाद तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. चित्रपट कोरोना लॉकडाऊनमधील पार्श्वभूमीवर असला तरी समाजातील विषमतेवर भाष्य करतो.