Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ( Ghar Banduk Biryani) हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar), सायली पाटील (Sayli Patil) अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C16 बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला.


'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.






चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ''अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.'' 


आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिर्याणीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Ghar Banduk Biryani : 'आशेच्या भांगेची नशा भारी... 'घर, बंदूक, बिरयानी'मधल्या गाण्याला मोहित चौहानच्या आवाजाचा तडका