Bade Miyan Chote Miyan Review : बॉलीवूडवाले (Bollywood) हॉलिवूडची नक्कल करून काही तरी वेगळे दाखवत आहोत असा आव आणतात. हॉलिवूडमध्ये देशभक्ती, देशाला दुश्मनांपासून वाचवणे, त्यासाठी अनेक नायकांनी एकत्र येणे दाखवून झाल्यानंतर आता हॉलिवूडवाले ब्रह्मांड वाचवण्याच्या मोहिमेवर आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडवाले आता देशभक्तीच्या रसात डुंबलेले आहेत. याची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षात आपण पाहिलेली आहेत. भारताचा एखादा गुप्तहेर असतो तो देशाला मोठ्या संकटातून वाचवतो असे आपण काही चित्रपटांमध्ये पाहिले आहे. त्यापैकी काही प्रचंड यशस्वी झाले तर काही धडामकन आपटलेही आहेत. अशा या आपटलेल्या चित्रपटांमध्ये 'बडे मियां छोटे मियां'चा (Bade Miyan Chote Miyan) समावेश करता येईल हे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते.


गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमार (Akshay Kumar) एकही हिट चित्रपट देऊ शकलेला नाही. त्याचे 'सम्राट पृथ्वीराज'पासून 'रक्षाबंधन'पर्यंत सर्व चित्रपट फ्लॉप झालेत. टायगर श्रॉफचेही (Tiger Shroff) तसेच आहे. 'हीरोपंती 2' (Heropanti 2) आणि 'गणपत' सुपरफ्लॉप झाले होते. अक्षय कुमार अॅक्शन आणि कॉमेडी चांगली करतो त्यामुळे तो प्रेक्षकांना आवडत होता पण त्याचा ओव्हरडोस व्हायला लागला होता. टायगर श्रॉफ डांस आणि अॅक्शनमध्ये माहीर आहे. या दोघांना एकत्र घेऊन देशभक्तीपर चित्रपट काढताना तसे कथानक तयार करायला हवे होते. त्यातच सोबतीला दक्षिणेतील सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनही घेतला असताना तर कथा आणखीन धारदार करायला हवा होता. फार कमी प्रेक्षकांना ठाऊक असेल की 2012 मध्ये आलेल्या सचिन कुंडलकरच्या 'अय्या' चित्रपटात पृथ्वीराज रानी मुखर्जीचा नायक होता. त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता, पण नंतर त्याला ऑफर न आल्याने तो पुन्हा केरळला जाऊन चित्रपट करू लागला आणि तिकडे सुपरस्टार  झाला.


'बडे मियां छोटे मियां'चं कथानक काय आहे? (Bade Miyan Chote Miyan Story) 


'बडे मियां छोटे मियां' चित्रपटाची कथा घासून घासून गुळगुळीत झालेली आहे. भारताचे वैज्ञानिक करण कवच तयार केलेले असते जे शत्रू राष्ट्रांच्या हल्ल्यापासून भारताला वाचवणारे असते. हे कवच सुरक्षित ठिकाणी नेले जात असताना त्यावर हल्ला केला जातो आणि ते कवच पळवून नेले जाते. ते कवच परत आणण्याची जबाबदारी कॅप्टन फिरोज (अक्षय कुमार) आणि कॅप्टन राकेश (टायगर श्रॉफ) पर सोपवण्यात येते. दोघांनाही कोर्ट मार्शलनंतर सैन्यातील नोकरी सोडावी लागलेली असते. मात्र देशाला गरज असल्याने कर्नल आझाद (रोनित रॉय) या दोघांना एकत्र बोलवतो आणि त्यांच्यावर करण कवच परत आणण्याची जबाबदारी सोपवतो. या दोघांना या कामात कॅप्टन मिशा (मानुषी छिल्लर) आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये विशेषज्ञ असलेली परमिंदर (अलाया एफ) मदत करते. शेवटी नेहमीप्रमाणे सगळे काही चांगले होते आणि दुसऱ्या भागाची हिंट देऊन चित्रपट संपतो.


'बडे मियां छोटे मियां' कसा आहे?


'बडे मियां छोटे मियां' चित्रपट सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत फक्त अॅक्शन, गाड्या उडवणे. बॉम्बस्फोट, गाड्या उडवणेच सुरु असते आणि मग मध्ये-मध्ये कथा येते आणि जाते. हॉलिवूडप्रमाणे भव्य दिव्य दाखवण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला खरा पण त्यात नवीन काही नसल्याने प्रेक्षकांचा विरस होतो. अॅक्शन दाखवण्याला काहीतरी अर्थ असेल तरच ती पाहाण्यासारखी असते.


अक्षय कुमारने कॅप्टन फिरोज उर्फ फ्रेडीची भूमिका  त्याच्या नेहमीच्याच पद्धतीने केली आहे. पण त्यात विशेष असे काही नाही. टायगर श्रॉफने अॅक्शन नेहमीप्रमाणेच केली असून डांसही केला आहे आणि कधी कधी प्रेक्षकांना हसवण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दोघेही प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात अयशस्वी झालेत.


खलनायक कबीरची भूमिका पृथ्वीराज सुकुमारनने अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली आहे, पण त्याचे कॅरेक्टर सशक्तपणे लिहिलेले नसल्याने त्याला जास्त काही करता आले नाही. चित्रपटापमध्ये तोच अक्षय आणि टायगरपेक्षा जास्त भाव खाऊन जातो. मानुषी छिल्लर आणि अलाया एफला अजून एक्सप्रेशनवर काम करण्याची खूप आवश्यकता आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. अली अब्बासने यापूर्वी सलमान खानला घेऊन सुलतान, टायगर जिंदा है चित्रपट प्रेक्षकांना दिले होते त्यामुळे या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा होत्या, पण केवळ भव्य दिव्य अॅक्शन दाखवून आणि देशभक्तीचा डोस देणे म्हणजे चांगला चित्रपट असत नाही तर त्याला एक चांगली कथाही लागते. अली अब्बास स्वतः एक पटकथा लेखकही आहे तरीही या चित्रपटाच्या कथेवर त्याने जास्त मेहनत न घेता फक्त पडद्यावर हॉलिवूडप्रमाणे काही तरी दाखवण्याचे ठरवून 350 कोटी रुपये खर्च करून वडे मियां छोटे मियां तयार केला आहे.


गाण्यांबद्दल तर न बोललेच बरे. एकूणच पैसे वाया घालवायचे असतील किंवा अक्षय, टायगरचे फॅन असाल तरच हा चित्रपट पाहायला जा.