Cuttputlli Review : कधीकाळी लागोपाठ हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) मागे आता ‘फ्लॉप’चा ससेमिरा लागला आहे. सतत तीन चित्रपट सपाटून आपटल्यानंतर आता धसका घेत अक्षयचा नवा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. साऊथच्या ‘रत्सासन’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकला अक्षय कुमारच्या ‘कटपुतली’ला (Cuttputlli) ओटीटीवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स अशा तिन्ही घटकांचं मिश्रण असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत तर नेलं. पण, अचानक शेवटाला हा चित्रपट सोडून दिल्यासारखा वाटला. चला तर, जाणून घेऊया हा कसा आहे हा चित्रपट...
काय आहे कथानक?
चित्रपटाची कथा सुरु होते हिमाचलमधल्या ‘परवानो’मध्ये... जिथे चर्चा सुरु आहे की, शहरातील क्राईम आता कमी झाले आहेत. इतक्यात समोर एका शाळकरी मुलीचा प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेला छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दिसतो आणि इथूनच सुरुवात होते क्राईम-थ्रिलर कथेची... परवानोनंतर कॅमेरा येतो थेट चंदीगढमध्ये आणि एन्ट्री होते अक्षय कुमारची. अक्षय कुमार एक सायकॉलॉजिकल थ्रिलर कथा लिहितोय. मात्र, त्याला या चित्रपटासाठी कुणीही निर्माता मिळत नाहीये. यानंतर तो रक्षाबंधनानिमित्ताने कसोलला बहीणीकडे जातो. आपल्या भावाने वडीलांच्या जागी पोलिसमध्ये भरती व्हावे, अशी तिची इच्छा असते. अखेर तिच्या इच्छेचा मान ठेवून तो पोलिस दलात सामील होतो.
अर्जन सेठी अर्थात अक्षय कुमार पोलिसदलात सामील झाल्यावर पुन्हा एकदा शहरातून एक शाळकरी मुलगी गायब होते आणि तिची देखील क्रूर हत्या होते. आता सायकॉलॉजीमध्ये मास्टर असलेल्या अर्जनला या खुनांमध्ये काहीतरी संबंध असावेत असे वाटते. पण, ज्युनियर असल्याने त्याचा आवाज दाबला जातो. त्यानंतर शहरात आणखी एक हत्या होते. आता मात्र त्याच्या थेअरीवर कुठे तरी विश्वास बसायला लागतो. त्याला या केसमध्ये सामील केलं जातं. मात्र, त्याने केलेल्या सगळ्या मेहनतीचं श्रेय हे त्याचे सिनिअर घेऊन जातात. याच दरम्यान तो केससाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो. मात्र, हा सिरीयल किलर काही केल्या आपला ठाव लागू देत नाही.
एक दिवशी अक्षय कुमारची स्वतःची भाची या सिरीयल किलरच्या हातून मारली जाते. यानंतर मात्र, तो पेटून उठतो. याच दरम्यान त्याला खोट्या आरोपावरून निलंबित केलं जातं. तरीही तो या केसवर काम करतो आणि त्या सिरीयल किलरचा ठाव ठिकाणा शोधून काढतो.
सस्पेन्स खिळवून ठेवतो...
या चित्रपटाला ‘कटपुतली’ हे नाव तसं तितकं शोभत नाही. अर्थात कटपुतली म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात त्या राजस्थानी बाहुल्या. मात्र, याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही. या चित्रपटात बाहुली मात्र आहे, जिला सिंड्रेला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक मुलीला पळवून नेल्यानंतर सिरीयल किलर त्या ठिकाणी एका गिफ्ट बॉक्समध्ये एका बाहुलीचे विद्रूप केलेले मुंडके ठेवून जातो आणि त्याच स्थितीत नंतर मुलींचा मृतदेह आढळतो. चित्रपट बघताना अनेकदा वाटतं की, सिरीयल किलर यांच्यातीलच एक असावा आणि प्रेक्षक प्रत्येकात त्याचा चेहरा पाहतो. मात्र, शेवटपर्यंत याचा उलगडा होत नाही. सिरीयल किलर नेमका कोण हे जाणून घेण्यासाठी आपण साहजिकच शेवटाची वाट पाहतो.
चित्रपट गडबडला कुठे?
काही प्रसंगांना दिलेलं संगीत त्या दृश्याची दाहकता आणखी वाढवतं. चित्रपटाचे लोकेशन खूप सुंदर आहेत. ज्या घरात मुलींची हत्या होते, ते घर एखादा भूतबंगला वाटावा असंच आहे. सस्पेन्समुळे प्रेक्षक मनातील राग साठवत शेवटपर्यंत पोहोचतो. मात्र, शेवट पाहताना पार भ्रमनिरास होतो. आता नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहायला हवा. अक्षय कुमार अनेकदा गंभीर दृश्यांमध्ये हसऱ्या चेहऱ्याने वावरतोय असं वाटतं. खूप दिवसांनी या चित्रपटातून अभिनेता चंद्रचूडचं दर्शन झालं आहे. रकुलप्रीतच्या भूमिकेला तितकासा वाव नाही. पण, सरगुन मेहता महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शोभून दिसली आहे. तर, साऊथ स्टार सुजित शंकर यानेही लिंगपिसाट शिक्षकाची भूमिका त्याची चीड यावी इतकी सहज साकारली आहे. तर, शेवटला प्रेक्षकांना एक सरप्राईज मिळते.
या चित्रपटाचं नाव सुरुवातीला ‘मिशन सिंड्रेला’ असं होतं. कदाचित हेच नाव चित्रपटाला जास्त शोभून दिसलं असतं. तर, चित्रपटाच्या शेवटाने मात्र फार निराशा केल्यामुळे कुठे तरी हा चित्रपट अचानक सोडून दिल्यासारखा वाटला. एकंदरीत सध्याचा बॉयकॉट ट्रेंड बाजूला ठेवून एकदा हा चित्रपट नक्कीच पाहू शकता. डिस्नीप्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.
हेही वाचा :