Sonali Phogat Case : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी केलेल्या तपासावर असमाधान व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी गोवा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा पोलिसांचे पथक गेल्या चार दिवसांपासून हरियाणातील हिसारमध्ये तपासासाठी असून, गोवा पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनाली फोगाट यांचे नातेवाईक विकास सिंघमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, 'गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’
पाहा पोस्ट :
पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसल्याचे विकास सिंघमार म्हणाले. उच्च न्यायालयाकडून सीबीआय तपासाला हिरवा कंदील मिळाल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सोनाली फोगाट (Sonali Phogat Murder Case) )यांना कट रचून हत्येच्या उद्देशाने गोव्यात नेण्यात आले. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना जबरदस्तीने अंमली पदार्थ देण्यात आले, हे तुम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
ड्रग्जमुळेच बिघडली सोनाली यांची प्रकृती
आतापर्यंत सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्येप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्स आढळले होते. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान, सोनाली फोगाट यांना गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट आपणच रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.
पुरावे सादर करणार
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात बोलताना गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणात सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि ही कागदपत्रे सुधीर सांगवान याला या खून प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: