Adipurush Movie Review : हे राम आणि जय श्रीराम... 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा पाहताना या दोनच गोष्टी लक्षात येतात. रामायणावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षक फक्त 'राम' या नावासाठीच सहन करू शकतात. प्रेक्षकांनी सिनेमागृहाबाहेरूनच यू टर्न घ्यावा यासाठी या सिनेमाला यू प्रमाणपत्र देण्यात आलं आहे का? असा प्रश्न सिनेमा पाहताना पडतो. 'आदिपुरुष' या सिनेमाला रिलीजआधीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 600 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सिनेमातील वीएफएक्सवर (VFX) मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. पण तरीही या सिनेमातील वीएफक्स खटकणारे आहेत.
'आदिपुरुष' या सिनेमाचं कथानक सर्वांनाच ठाऊक आहे. रामायणावर आधारित असलेल्या या पौराणिक सिनेमात अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे हा सिनेमा कुठेतरी अपूर्ण वाटतो. 'आदिपुरुष' या सिनेमाची कथा कुठेही प्रेक्षकांना बांधून ठेवत नाही. रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता. पण 'आदिपुरुष' सिनेमा मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कमी पडला आहे.
'आदिपुरुष' सिनेमा कसा आहे?
'आदिपुरुष' हा सिनेमा सुरुवातीला खूप रटाळ वाटतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा सिनेमा खूपच कमी पडला आहे. पण हनुमानाच्या एन्ट्रीने प्रेक्षक सिनेमासोबत थोडासा जोडला जातो. हनुमाना व्यतिरिक्त कोणतही पात्र प्रेक्षकांसोबत जोडलं डात नाही. खराब वीएफएक्समुळे सिनेमा आणखी वाईट झाला आहे. असे कोट्यवधी रुपये खर्च करुन त्यावेळी रामानंद सागर यांनी सिनेमाची निर्मिती केली असती तर सिनेमा कसा झाला असता असा प्रश्न पडतो. या सिनेमातील संवादेखील प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. सिनेमातील लढाईची दृश्ये पाहताना झोम्बी लढत आहेत, असं वाटतं. 'आदिपुरुष'ला हॉलिवूड टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातील फक्त सतत ऐकू येणारं श्रीरामाचं नाव ऐकण्यासारखं आहे.
'आदिपुरुष' सिनेमातील कलाकारांचा अभिनय कसा आहे?
प्रभासला (Prabhas) श्रीरामाच्या भूमिकेत पाहणं पसंत पडलेलं नाही. कृती सेननचा (Kriti Sanon) अभिनय चांगला आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंहनेदेखील (Sunny Singh) चांगलं काम केलं आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan) छाप पाडण्यात कमी पडला आहे. देवदत्त नागेने हनुमानाच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे.
'आदिपुरुष' सिनेमाचं संगीत खूपच चांगलं आहे. अजय-अतुल या जोडगोळीने सिनेमातील गाणी खूपच चांगली संगीतबद्ध केली आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांना रामायणाबद्दल माहिती द्यायची असेल तर त्यांना तुम्ही हा सिनेमा दाखवू शकता. कारण आजच्या काळातील मुलं रामायणावर आधारित असलेली मालिका पाहायला पसंती दर्शवणार नाहीत.