Main Atal Hoon Review: अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे असे नेते होते ज्यांचं विरोधी पक्षातील नेते देखील कौतुक करत होते.  पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारली. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मला वाटले की, पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिसत नाहीयेत, पण चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटले की, ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखेच दिसत आहेत.


चित्रपटाचे कथानक



ही कथा आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाची. बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा अटलजींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांचा राजकीय प्रवासच नाही तर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. एक माणूस म्हणून, कवी म्हणून, मित्र म्हणून अटलजी कसे होते? हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.  


चित्रपट कसा आहे?


आजच्या पिढीला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सारख्या नेत्याबद्दल कमी माहिती असेल, त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी माहितीपट ठरू शकतो, अटलजींना ओळखणार्‍यांसाठी यात नवीन काही पाहायला मिळणार नसल्याची शक्यता आहे. पण तरीही हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. चित्रपटात अटलजींची कहाणी छान दाखवण्यात आली आहे. त्यांच्या जीवनातील अनेक पैलू  चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांमधून अटलीजींची कथा थोडक्यात मांडण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.  चित्रपट तुमचे मनोरंजन करेल.  


कलाकारांचा अभिनय


पंकज त्रिपाठी हे या चित्रपटाचा जीव आहेत. त्याने अप्रतिम काम केले आहे. अटलजींसारख्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक आहे. यात काही चुकले तर अटलजींचे चाहते गोंधळ घालतील. पण पंकज त्रिपाठी यांनी अटलजींची प्रत्येक शैली चांगल्या पद्धतीनं मांडली आहे. मग त्या त्यांच्या कविता असोत किंवा त्यांची भाषणे. पंकज त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त, अटलजींच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले पियुष मिश्रा यांनी देखील चांगले काम केलं आहे.  चित्रपटाची सपोर्टिंग कास्ट उत्तम आहे.


दिग्दर्शन


रवी जाधव यांचे दिग्दर्शन उत्तम आहे.चित्रपट मनोरंजक बनवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे, त्यात ते यशस्वीही झाले आहेत. राजकीय घटना ज्या पद्धतीने मांडल्या आहेत ते कंटाळवाणे वाटत नाही. ही कथाही हृदयाला भिडते. चित्रपटाचे संगीत देखील चांगले आहे. 


एका महान व्यक्तीचे जीवन एका चित्रपटात मांडणे अवघड आहे, पण हा प्रयत्न चांगला आहे. एकंदरीत हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत जरूर पहा.