Brahmastra Review  : हॉलिवूडच्या अॅव्हेंजर किंवा सुपरहिरो चित्रपटांप्रमाणे अयान मुखर्जीने अॅस्ट्राव्हर्स त्रिधारा निर्माण करण्याचा संकल्प सोडलाय. अनेक वर्ष तो या चित्रपटावर काम करीत होता. मात्र चित्रपट पाहाताना त्याने नक्की काय काम केले असा प्रश्न पडतो. चित्रपटाची कथा तशी बघायला गेलो तर खूप चांगली आहे, पण बंदिस्त पटकथा नसल्याने चित्रपट स्वैरपणे फिरत राहातो आणि मध्ये-मध्ये मूळ वळणावर येतो. हे पटकथेबरोबरच दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जीचे अपयश आहे.


चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबत शाहरुख खान आणि नागार्जुनही पाहुणे कलाकार म्हणून दिसतात. रणबीरने शिवाची भूमिका नेहमीप्रमाणेच चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केलाय. आलियाला तसे पाहायला गेले तर काहीच काम नाही. फक्त नायकाला नायिका हवी म्हणून ती आहे. चित्रपटात अनेक प्रश्न अर्धवट सोडलेत. अर्थात या चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार असल्याने त्यात आलियाची किंवा अन्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न अयान करणार असेल.


हुसेन दलाल यांचे संवाद जराही प्रभावित करीत नाहीत. तसेच संगीतकार प्रीतमने गीतांवर मनापासून काम केलेले दिसून आले नाही. प्रीतमच्या संगीतापेक्षा सायमन फ्रॅन्ग्लेनचे पार्श्वसंगीत खूपच चांगले आहे. विदेशी तंत्रज्ञ चांगले काम करतात यात शंका नाही. असेच काम डीनेग नावाच्या एका विदेशी कंपनीने व्हीएफएक्सवर केलेले आहे. त्यामुळे व्हीएफएक्स खूपच चांगले झालेले आहेत. याच कंपनीने ड्यून या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम केलेले आहे.


एकूणच करण जोहर, रणबीर कपूर, अयान मुखर्जी द्वारा निर्मित पावणे तीन तासांचा हा चित्रपट गाणी आणि मध्ये-मध्ये भरकटल्यामुळे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरलाय. जर अयान आणि कंपनीने चित्रपटातील गाणी काढून आणखी चांगल्या पद्धतीने एडिट करून दोन तासात बसवला असता तर मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडला असता यात शंका नाही.


अडीच स्टार. दीड स्टार व्हीएफएक्ससाठी आणि एक स्टार निर्मात्यांच्या धाडसासाठी. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: