Yoga For Mental Health : सध्या सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे. त्यामुळे घराघरांत थोडं तणावपूर्वक वातावरण झालं आहे. लहान मुलांना आजूबाजूच्या तणावपूर्वक वातावरणामुळे नकारात्मकता, अभ्यासाची काळजी या गोष्टींमुळे ताण येतो. हा परीक्षेचा ताण घ्यायचा नसेल तर आपल्या दिनक्रमात बदल न करता, वेळेचे नियोजन करत, थोडा वेळ योगाभ्यासासाठी देणं गरजेचं आहे. योगामुळे मुलांना परीक्षेच्या ताण तणावांना सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. चांगले आरोग्य, मनःशांती, व्यक्तिमत्त्व विकास अशा सर्वांगीण विकासासाठी योग आवश्यक आहे. योगासना बरोबरच प्राणायाम, ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते. मन शांत, तणावरहित होण्यास मदत होते.
या संदर्भात (होमिओपॅथीक फिजिशियन, योगा थेरपिस्ट) डॉ. अंजली बाळकृष्ण उमर्जिकर यांनी ताण तणाव कमी करण्यासाठी काही आसने, प्राणायाम, ध्यान कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे.
1. सूर्यनमस्कार :
एक परिपूर्ण व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. याच्या बारा अवस्थांमध्ये संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तर स्नायूंना व्यायाम मिळतो, श्वसनाचा व्यायाम होतो, शरीर योग्य प्रमाणात ताणले जाते, पोटातील अवयवांना व्यायाम होतो, शरीराची लवचिकता वाढते आणि हृदयाला रक्ताभिसरण चांगले होते. असे अनेक फायदे सूर्यनमस्कार घातल्यामुळे होतात. मन प्रसन्न करण्यासाठी याचा उपयोग होतो. मनावरील ताण हलका होऊन मन शांत होते. यासाठी रोज किमान बारा सूर्यनमस्कार घातले पाहिजेत.
2. ताडासन :
या असनाने तणाव, थकवा दूर होतो. शरीरातील तणाव दूर झाल्यामुळे मानसिक ताण ही नाहीसा होतो.
3. सेतु बंधासन :
मन शांत करण्याबरोबरच पाठीच्या स्नायूंना बळकट करते. उदासीनता दूर करण्यास मदत करते. हे मागच्या स्नायूंना आराम देते. तसेच ज्यांना पाठीच्या समस्या आहेत. त्यांनी हे आसन नियमितपणे करावे.
4. मार्जारासन :
त्यामानाने सोपे असलेल्या या आसनामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मन अगदी सहजपणे हलके होते.
5. शवासन :
दररोज जर आपण 5 ते 10 मिनिटे शवासन केले तर आपला सर्व ताण दूर होतो आणि आपले मन शांत राहण्यास मदत होते. शवासन करण्यासाठी पाठीवर आरामात झोपा आणि हात आणि पाय बाजूला ठेवून झोपा. डोळे बंद करा आणि मन मोकळे करण्याचा प्रयत्न करा.
6. अनुलोम विनोम
हा प्रामायाम करण्यासाठी सरळ बसावे. त्यानंतर उजव्या नाकपुडीला उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. हा योगाप्रकार नियमितपणे कमीत कमी 3 ते 5 मिनिटे केल्याने ताणापासून दूर राहण्यासाठी मोठी मदत होते.
7. नाडी शोधन प्राणायाम
प्राणायामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मनावर नियंत्रण करणे असे आहे. जेव्हा मन नि:श्चल होते त्यावेळी कोणत्याही विचारांची प्रक्रिया किंवा भावनिक अडथळे निर्माण करू शकत नाही म्हणून मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण विविध प्रकारच्या भावनांवर विजय मिळवू शकतो.
8. ध्यान : ध्यानामुळे मन ताजेतवाने होते. दररोज किमान 5--10 मिनटे ध्यान करावा. तसेच, ध्यानामुळे अनामिक भीती कमी होते. भावनात्मक स्थिरता वाढते. मानसिक शांती मिळते. समस्या छोट्या वाटू लागतात. एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होतायत? 'या' घरगुती उपायांनी मिळवा आराम