Holi 2022 : देशात होळी (Holi) हा सण साजरा केला जातो. आपल्यासारख्या बहुसंख्य शहरी लोकांसाठी आपले मित्र आणि शेजारी यांच्यासोबत रंग खेळून मजा करण्याचे हे अजून एक निमित्त आहे. एके काळी होळीचा सण फुले व नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा. त्याची जागा आता रासायनिक रंग, पाण्याचे फुगे आणि फॅन्सी पाण्याच्या पिचकाऱ्यांनी घेतली आहे. याचा साहजिक परिणाम म्हणजे डोळ्यांना होणाऱ्या इजा. त्यामुळे होळी खेळताना डोळ्यांची कशी काळजी घ्यावी त्याबाबत माहिती जाणून घेऊयात....


होळीदरम्यान येणाऱ्या काही समस्या खालीलप्रमाणे :
डोळ्यांच्या बाहुलीच्या पातळ पडद्याला ओरखडा जाणे
डोळ्यांमध्ये रासायनिक जळजळ होणे
अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस (रसायनाची अॅलर्जी असल्यामुळे डोळ्याच्या सर्वात बाहेरच्या पारदर्शक स्तराला सूज येणे)
पाण्याचा फुगा लागल्याने डोळ्यांना धक्का लागणे आणि डोळ्याच्या आतील बाजूस रक्तस्त्राव होणे, डोळ्याच्या भिंगाची जागा बदलणे, रेटिना विलग होणे (रेटिना हा डोळ्याचा छायासंवेदनशील स्तर विलग होणे), मॅक्युलर एडिमा (रेटिनाच्या मध्यवर्ती भागाला सूज येणे).
 
डॉ. वंदना जैन यांनी दिली माहिती-
मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या रिजनल हेड, डॉ. वंदना जैन म्हणाल्या, "या उजांवर तत्काळ उपचार केले नाही तर त्यांचा दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मुंबईसारख्या महानगरात शारीरिक इजा झाल्यामुळे डोळ्यांना होणाऱ्या इजांचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याच्या फुग्यांचा वापर करण्याचे प्रमाण घटल्यामुळे हे झाले असेल. होळीशी संबंधित डोळ्यांच्या गंभीर इजांचे प्रमाण घटले असले तरी होळीनंतरचे पुढील काही दिवस मुले आणि तरुण डोळ्यांमध्ये झालेला लालसरपणा, चुरचुरणे, प्रकाशाचा त्रास होणे इत्यादी तक्रारी घेऊन येत असतात. यापैकी बहुतेक त्रास हा गुलाल वा रंग डोळ्यात गेल्याने किंवा चुकून बोट डोळ्यात गेल्याने होतो.


त्यांनी पुढे सांगतिले, "तुमच्या डोळ्यात रंग गेले तर डोळे चुरचुरू शकतात किंवा लाल होऊ शकतात. पण डोळ्यात पाणी मारल्यावर ते निघून जातील आणि तुमचा त्रास कमी होईल. पण जास्तच जळजळ होत असेल, वेदना होत असतील किंवा दृष्टी धुसर झाली असेल तर लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवावे. अनेकांना असे वाटते की, कॉन्टॅक्ट लेन्स हा होळीमध्ये सुरक्षित पर्याय असतो. पण वस्तुस्थिती ही आहे की, कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात जाणारा रंग शोषून घेतात आण तो रंग साकळतो. त्यामुळे डोळ्यांना जास्त इजा होऊ शकते. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोझेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे.


नैसर्गिक रंग हा अत्यंत सुरक्षित पर्याय आहे. हळद व बेसन यांचे मिश्रण करून पिवळा, पलाश वा गुलमोहराच्या फुलांच्या पाकळ्या केशरी रंगासाठी, पाण्यात बिटरूट भिजवले तर गुलाबी रंग तयार होतो, लाल रंगासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर करणेही तितकाच आनंद देते. या होळीला तुमच्या डोळ्यांनाही या सणाचा विपुल आनंद घेऊ दे, कारण होळीचा सण हा आनंदाचा सण आहे.


डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स :
रंग खेळून झाल्यावर ते सहज निघावे यासाठी तुमच्या डोळ्यांभोवती कोल्ड-क्रीमचा जाडसर थर लावा. असे केल्याने, चेहरा धुतल्यावर रंग लगेच निघतात. रंग पाण्याने काढून टाकताना तुमचे डोळे घट्ट मिटून ठेवा.
तुम्ही कारने प्रवास करणार असाल तर काचा बंद ठेवा. अनेकदा उघड्या काचेतून अनपेक्षितपणे एखादा फुगा येतो आणि डोळ्यांना लागतो.
नैसर्गिक रंगांनी खेळण्यासाठी तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या.
रंगीत पाण्यापासून बचाव करण्यासाठी गॉगल/प्रोटेक्टिव्ह आय वेअर घाला.
 
डोळ्यांना इजा झाली तर :
तुमच्या डोळ्यात रंग गेला असेल तर सामान्य तापमान असलेल्या भरपूर पाण्याने डोळे धुवा
डोळे लालसर झाले, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असले, चुरचुरत असतील किंवा प्रकाशाप्रती संवेदनशील असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरची भेट घ्या. डोळे चोळू नका.
डोळ्याला पाण्याचा फुगा लागला तर तुमचे डोळे स्वच्छ कापडाने झाका आणि लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha