मुंबई : नारळाच्या झाडाला कल्पतरु म्हणतात हे ठाऊक असेलच. नारळाला सत्य सृष्टीतील कल्पतरु म्हणतात कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मनुष्याला उपयोग होतो. नारळाच्या झाडाचं लाकूड उपयोगी असतं. त्याचं पाणी आपली तहान भागवतं. नारळाची साय एखाद्याचं पोट भरते. तर नारळाच्या झावळ्यांनी डोक्यावर छप्पर मिळतं. सगळ्या शुभ आणि धार्मिक कामांमध्येही नारळाचं खूप महत्त्व आहे. सन्मान करण्यासाठीही नारळाचा वापर होतो. म्हणूनच आपण नारळाला श्रीफळ असंही म्हणतो. बऱ्याच पदार्थांमध्येही आपल्याकडे नारळाचा हमखास वापर होतो.


भारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. एशिअन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCCकडून नारळाचं महत्त्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला. जगभरातील 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं.

आज जागतिक नारळ दिवस आहे. त्यानिमित्ताने नारळाचे वेगळे फायदे आणि प्रकार बघूया.

- जगभरात नारळाच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि फिलिपिन्सनंतर भारताचा तिसरा क्रमांक येतो. भारतात एका वर्षात 2395 कोटी नारळांचं उत्पादन होतं आणि देशाच्या जीडीपीमध्ये 27900 कोटींचा वाटा नारळाचा असतो.

- नारळ हे असे झाड आहे जे चंदनापेक्षा जास्त उत्पादन देऊ शकतं.

- एकदा लागवड केल्यानंतर या झाडातून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळतं.

- नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळं येतात

- नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते. या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो.

- झाडावरील नारळ चोरीला जाण्याची भीतीही नसते.

World Coconut Day | खोबऱ्याच्या तेलाचे 'हे' आरोग्यदायी फायदे; दैनंदिन जीवनात करा वापर

नारळाच्या तीन प्रमुख जाती असतात..

1. उंच जाती
2. ठेंगू जाती
3. संकरित जाती

उंच जाती
उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली. नाराळाच्या या जातीचं आयुष्य 80 ते 100 वर्ष असतं आणि या झाडापासून एका वर्षात 80 ते 100 फळं मिळतात.

यातलाच दुसरा प्रकार आहे लक्षद्विप ऑर्डिनरी. याला चंद्रकल्पा असंही म्हणतात. या झाडापासून वर्षात नारळाची 150 फळं मिळतात. या एका नारळापासून 140 ते 150 ग्रॅम खोबरं मिळतं. तेल उत्पादनातही 72 टक्के याच नारळाच्या जातीचा उपयोग होतो.

तर तिसरा प्रकार आहे प्रताप. या झाडापासूनही वर्षाला 150 नारळ मिळतात.

नारळाच्या उंच जातीतला चौथा प्रकार आहे फिलिपिन्स ऑर्डिनरी. हे नारळ आकाराने फार मोठे असतात.. एका नारळापासून 250 ग्रॅम खोबरं मिळतं.

ठेंगू जाती
नारळाची दुसरी मुख्य जात आहे ठेंगू जात. ही झाडं उंचीने कमी असतात. या जातीतील नारळाची त्यांच्या रंगांवरुन ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत. यातली ऑरेंड डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते.

संकरित जात
नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात. यात केरासंकरा, टंद्रसंकरा या पोटजाती आहेत. या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनांसाठीही या नारळांना मोठा उपयोग होतो.