मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आजपासून गोव्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार, रेस्टॉरंटदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनुसार कालपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या झाल्या आहेत. सर्व वाहनांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.





आज मुख्यमंत्री सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घरातच विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी'.


आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला


याआधी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली होती. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांना देखील गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना देखील डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. तसेच, या पूर्वी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफसियो डायस, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमांव यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.