Women Health : 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटातून महिलांच्या आरोग्याबद्दल अधोरेखित करण्यात आलं. त्यानंतर मेनॉपॉज या विषयाचं गांभीर्य समोर आलं. अनेकांना मेनॉपॉजचा खरा अर्थ कळला. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीला मेनॉपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीतून जावे लागते. रजोनिवृत्तीची लक्षणं ही वयाच्या 45 वर्षानंतर दिसू लागतात. रजोनिवृत्ती ही पूर्णपणे नैसर्गिक आहे. या काळात महिलांची मासिक पाळी थांबते. हा स्त्रियांच्या प्रजननचा शेवटचा टप्पा असतो आणि यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होणार असते.


 


महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक


मेनॉपॉजच्या काळात महिलांना अनेक समस्यांमधून जावे लागते, ज्याचे परिणाम त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सहन करावे लागतात. या काळात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे मूड बदलणे, केस गळणे, तणाव, स्नायू दुखणे, रात्री खूप घाम येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, या काळात महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेऊन त्यांच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम करून आणि या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास महिलांना काही प्रमाणात आराम मिळू शकतो. यावेळी आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. रजोनिवृत्ती सुलभ करण्यासाठी काही पदार्थ जाणून घ्या. ज्यांचा आहारात समावेश करण्याची गरज आहे.


 


दुग्धजन्य पदार्थ


स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या काळात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची सर्वाधिक गरज असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि स्नायूंना वेदना होत नाहीत. यासाठी दूध, दही, चीज, इत्यादींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यासोबतच हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.


 


सोयाबीन


सोयाबीन, टोफू, आणि सोया दूध यासारखे सोया उत्पादनं हार्मोन्स संतुलित करण्यात मदत करतात, ज्यामुळे मूड बदलणे आणि ताण यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


 


सुका मेवा आणि बिया


रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी त्यांच्या आहारात बदाम, अक्रोड, चिया बिया, सुर्यफूल बिया यांसारखा सुका मेव्याचे सेवन करावे. हे फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो, ज्यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते. याशिवाय यामध्ये असलेले मॅग्नेशियम देखील मूड चांगला ठेवते.



फायबरयुक्त पदार्थ


ओटचे जाडे भरडे पीठ, ब्राऊन राइस इत्यादी फायबरयुक्त पदार्थ पचन व्यवस्थित ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. यासोबतच यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी मूड चांगले ठेवते.


 


पालेभाज्या


रजोनिवृत्तीच्या काळात कोबी, ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्यांचे सेवन करणेही फायदेशीर ठरते. यामुळे इस्ट्रोजेनची पातळी राखण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो.


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो स्वत:लाही जपा, 'या' कारणांमुळे चाळीशीतच जातेय मासिक पाळी, तोटे जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )