Women Health : ओलांडून उंबरठा...वाट नवी शोधते..भेदून तू संकटांना..घाट नवा कोरते.. केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटातील या गाण्यांच्या ओळीनं अवघ्या महिला मंडळींच्या डोळ्यात अश्रू आणले. सध्या महिला या चूल-मूल पर्यंत मर्यादित न राहता स्वत:चे करिअर घडवण्यासाठी नोकरी करताना दिसत आहेत. संसाराच्या गाड्यात केवळ पुरुषांवरच ताण येऊ नये म्हणून महिलाही हे धनुष्य बरोबरीने पेलत आहेत. पण कौटुंबिक जबाबदारी, स्वयंपाक, मुलांचे संगोपन या गोष्टी सांभाळून नोकरी करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यात नोकरीच्या ठिकाणीही पुरुषांपेक्षा महिलांना तणावाचा सामना अधिक करावा लागतोय, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. जाणून घेऊया..


 


21 ते 30 वयोगटातील महिलांमध्ये अधिक तणाव



वेलनेस कंपनीच्या रिपोर्टमध्ये काही निष्कर्ष समोर आले आहेत. त्यात असा दावाही करण्यात आला आहे की, तणावग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. ऑफिसमध्ये 21 ते 30 वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक तणाव आहे. यामध्ये नोकरदार महिलांचा समावेश अधिक आहे. कार्यालयांमध्ये तणावग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असल्याचेही समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी 21 ते 30 वयोगटातील तरुणांना महिला आणि पुरुषांपेक्षा अधिक कार्यालयीन ताणतणावात असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. एका अभ्यासानुसार, जयपूरच्या मनोरुग्ण केंद्रात दररोज 15 ते 20 रुग्ण तणावामुळे पोहोचत आहेत. यामध्ये नोकरदार महिलांची संख्या अधिक आहे.


महिलांमध्ये तणावाचे कारण - काम आणि जीवन यांच्यातील संतुलनाचा अभाव. कमी मनोबल, टीकेची भीती, निर्णय, शिफ्ट बदल.


पुरुषांमध्ये तणावाचे कारण - कामाच्या ठिकाणी सतत होणाऱ्या बदलांमुळे पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, रिमोट आणि हाइब्रिड वर्क कल्चर  हे देखील कारण आहे.



महिला - 72.2 उच्च पातळीच्या तणावाने ग्रस्त आहेत
पुरुष - 53.65% उच्च पातळीच्या तणावाने ग्रस्त आहेत


जबाबदारी समतोल करण्यासाठी धडपड - महिला -18%, पुरुष - 12%


नेहमी उदास  - महिला - 20%, पुरुष - 9.27%


 


तणावामुळे कोणते आजार होऊ शकतात?


एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, मानसोपचारतज्ज्ञ धरमदीप सिंग यांनी सांगितले की, सतत आणि प्रदीर्घ तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) मोठ्या प्रमाणात तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजारांचा धोका असतो. यासोबतच एकाग्रतेचा अभाव, नैराश्य आणि चिंता वाढू लागते. 


 


पुरुषांच्या की स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम होतो?


संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाला सर्वात जास्त आर्थिक मदत कोण करत आहे, याचा देखील व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, महिलांचे उत्पन्न त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत वाढल्याने त्यांना नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. संशोधकांना असे आढळले की, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे पुरुषांचे राहणीमान तर सुधारतेच, पण त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. या अभ्यासात 1463 पुरुष आणि 1769 महिलांचा समावेश करून त्यांचे मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य तपासण्यात आले. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा एखादी महिला आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी रजा घेते आणि घरी राहण्यास सुरुवात करते. तेव्हा तिच्या मानसिक आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. पण याउलट जेव्हा पुरुष मुलांची काळजी घेण्यासाठी घरी राहतात तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो. नोकरी आणि घराच्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे येणारे नैराश्य यामध्ये स्त्री-पुरुषांमध्ये फरक असल्याचेही संशोधकांनी सांगितले. 


 


 


हेही वाचा>>>


Women Health : IVF मुळे नेहमी जुळी मुलंच होतात का? नेमकं सत्य काय? तज्ज्ञांकडून योग्य उत्तर जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )