Women Health : सध्या बदलत्या काळानुसार महिलाही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरीनिमित्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशात कुटुंबाची जबाबदारी, कामाचा ताण, मुलांचे संगोपन यासारख्या अनेक गोष्टींमुळे महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. तर काही महिला घरी राहून मुलांची, कुटुंबाची काळजी घेताना दिसतात. मात्र स्वत:ची काळजी घ्यायला त्यांना अजिबात वेळ नसतो, ज्याचा परिणाम त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतोय. आपण नेहमी पाहतो, महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्या निरोगी राहिल्या तर कुटुंबही निरोगी राहील. वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांना अनेक आजारांचा धोका असू शकतो, त्यासाठी त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विविध आजार टाळण्यासाठी, वेळोवेळी काही चाचण्या कराव्यात, जेणेकरून रोग प्रारंभिक अवस्थेत ओळखता येईल. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शिराली अरविंद रुणवाल यांनी याबाबत माहिती दिलीय. जाणून घ्या..


 


मॅमोग्राफी चाचणी


महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यासाठी मॅमोग्राफी चाचणी करावी. वयाच्या 40 नंतर ही चाचणी दरवर्षी केली पाहिजे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करून क्लिनिकल ब्रेस्ट तपासणी केली जाऊ शकते.


 


पॅप स्मीअर चाचणी


महिलांनाही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचे स्क्रीनिंग वयाच्या 21 व्या वर्षापासूनच सुरू झाले पाहिजे. मात्र वयाच्या 40 वर्षानंतर असा गंभीर कर्करोग टाळण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे.


 


RA घटक चाचणी


महिलांमध्ये सांधेदुखीची समस्याही दिसून येते. अनेक महिलांना वयाच्या 40 नंतर त्यांना सांधेदुखीचा त्रास होतो. यासाठी स्क्रिनिंग टेस्टही करावी. तुम्ही RA फॅक्टर चाचणी करून घेऊ शकता. ही चाचणी करून घेतल्यास सांधेदुखीचा धोका लक्षात येतो.


 


व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 चाचणी


महिलांमध्ये पौष्टिकतेची कमतरता दिसून येते. काही महिलांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दिसून येते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. त्यांची चाचणी घ्यावी.


 


हृदय आणि शरीरातील साखर चाचणी


स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून, 40 वर्षांनंतर निरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखान्यात जाऊन तुमची बीपी, ईसीजी किंवा टीएमटी चाचणी तीन महिन्यातून एकदा करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे शुगर टेस्ट आणि HbA1c चाचणी देखील करता येते. तसेच लिपिड प्रोफाइल टेस्ट करून घ्या.


 


डेक्सा स्कॅन चाचणी


मेनोपॉजनंतर महिलांमध्ये साधारण चाळीशीनंतर हाडांचा क्षय होऊ लागतो. त्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात, विशेषत: मणक्याची, पायांची हाडे आणि मनगटाची हाडे. या सर्वांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढतो. याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. यासाठी तुम्ही डेक्सा स्कॅन चाचणी करून घेऊ शकता. ही चाचणी हाडांची घनता दर्शवते.


 


हेही वाचा>>>


Women Health : काळजी घ्या, लहान वयातच मुलींना येतेय मासिक पाळी, पालकांची चिंता वाढली, काय आहे कारण?


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )