Women Health : जन्म बाईचा..खूप घाईचा...खरंय.. बदलत्या काळानुसार महिलांमध्ये शारिरीक आणि मानसिक आरोग्यात बदल होत चाललेत. आजकाल अनेक महिला या चूल-मूल पर्यंत मर्यादित न राहता करिअरही करत आहेत. यात कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि कामाचा ताण यामध्ये महिलांची तारेवरची कसरत पाहायला मिळते, ज्याचा परिणाम त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर तर होतोच. त्यातच आता आणखी एक चिंता वाढलीय. ती म्हणजे लहान वयातच मुलींना लवकर येणारी मासिक पाळी...
ही एक चिंतेची बाब
आजकाल मुलींना कमी वयात मासिक पाळी येणे ही चिंतेची बाब बनली आहे. एका संशोधनानुसार, वयाच्या 11 वर्षापूर्वी मासिक पाळी येणाऱ्या मुलींची संख्या 8.6% वरून 15.5% झाली आहे आणि 9 वर्षापूर्वी मासिक पाळी येणा-या मुलींची संख्या दुपटीने वाढली आहे. ही परिस्थिती मुलींच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. JAMA नेटवर्क ओपन जर्नलच्या संशोधनानुसार, अमेरिकेतील मुलींना 1950 आणि 60 च्या दशकाच्या तुलनेत सरासरी 6 महिने आधी मासिक पाळी येते. या संशोधनात असे आढळून आले की, 1950 ते च1969 या काळात हा कालावधी वयाच्या 12.5 व्या वर्षी सुरू झाला, तर 2000 ते 2005 या कालावधीत तो 11-12 वर्षे वयापासून सुरू झाला. आता 11 वर्षापूर्वी मासिक पाळी येणा-या मुलींची संख्या 8.6% वरून 15.5% झाली आहे.
आरोग्यासाठी हानिकारक?
मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. यामुळे मुलींमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा, गर्भपात आणि लवकर मृत्यूचा धोका वाढतो. यासोबतच मासिक पाळी लवकर येण्यामुळे अंडाशय आणि स्तनाचा कर्करोग यांसारखे विविध कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.
मुख्य कारण
लठ्ठपणा - लहान वयात लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण आहे. लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढते, जे मासिक पाळी लवकर सुरू झाल्याचे सूचित करते.
ताणतणाव - तणावामुळे कोर्टिसोल आणि एंड्रोजन हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर सुरू होण्यास मदत होते.
वातावरणातील केमिकल्सचा प्रभाव - आपल्या वातावरणात पसरणारी हानिकारक रसायने देखील मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावतात.
कॉस्मेटिक उत्पादने - मुलींनी वापरलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये हार्मोनल बदल घडवून आणणारे घटक देखील असू शकतात.
पालकांसाठी महत्वाच्या टिप्स
संतुलित आहार - पालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांच्या मुलींनी फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार घेतला पाहिजे. निरोगी आणि संपूर्ण आहार घेतल्यास अकाली यौवन आणि मासिक पाळी येण्याचा धोका कमी होतो.
नियमित व्यायाम - मुलांना नियमित व्यायाम करण्यास प्रवृत्त करा. यामुळे शरीर निरोगी राहते आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.
पुरेशी झोप - उशिरा झोपणे आणि कमी झोप लागणे याचाही संबंध लवकर येणाऱ्या तारुण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे मुलांना पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.
तयारी आणि जागरुकता - पालकांनी आपल्या मुलांना मासिक पाळीविषयी माहिती अगोदरच द्यावी, जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार होतील.
या उपायांचा अवलंब करून, पालक त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारू शकतात आणि अकाली मासिक पाळी येण्याचा धोका कमी करू शकतात.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो तुमचं हृदय जपा.. मेनोपॉजनंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतोय? संशोधनातून माहिती समोर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )