Women Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं यासारख्या गोष्टींमुळे बऱ्याचशा महिला आपल्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतात. सध्या सर्व्हायकल हेल्थ जागरूकता महिना सुरू आहे. यानिमित्त महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची जनजागृती करण्यात येतेय. अनेक महिला कर्करोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम त्यांना शारिरीक तसेच मानसिक स्वरुपात भोगावा लागतो. यशस्वी गर्भधारणेसाठी गर्भाशय आरोग्य चांगले आरोग्य राखणे आवश्यक आहे. मातृत्वाचा प्रवास सुरु करण्यापूर्वी महिलांना गर्भाशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते यांनी काही खास टिप्स या लेखाच्या माध्यमातून दिल्या आहेत.


बऱ्याच महिलांना गर्भाशयाच्या आरोग्याचे महत्त्व माहित नसते


गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे 'Cervix' (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा. गर्भवती महिलेला प्रसूती होईपर्यंत बाळाला स्थिर व सुरक्षित राखण्यासाठी गर्भाशय ग्रीवा फायदेशीर ठरते. ठेवण्यासाठी जबाबदार असते. तुम्हाला माहिती आहे का? गर्भाशय ग्रीवा निरोगी असल्यास बाळाच्या योग्य विकासात मदत होते. अकाली जन्म किंवा गर्भपातासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना गर्भाशयाच्या आरोग्याचे महत्त्व माहित नसते. गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ग्रीवाच्या आरोग्याच्या व्यवस्थापन कसे कराल याविषयी खाली दिलेल्या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.
 
वेळोवेळी तपासणी : नियमित तपासणी ही तज्ञांना गर्भाशय ग्रीवाच्या समस्या जसे की संसर्ग, असामान्यता किंवा गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे बदल यासारखी सुरुवातीच्या लक्षणे शोधण्यास मदत करते. वेळोवेळी तपासणी केल्याने कोणत्याही विलंब न करता योग्य प्रकारचे उपचार सुरू करण्यास मदत होईल.


सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे : हे सर्वांनाच माहीत आहे की, संभोगादरम्यान सुरक्षा पर्यायाचा वापर करणे हे लैंगिक आरोग्य चांगले राखणे तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या संसर्गापासून दूर राहण्यास मदत करते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होऊ शकते.


वजन नियंत्रित राखणे : संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने गर्भाशयाच्या मुखावरील ताण कमी होतो आणि गर्भधारणेदरम्या होणारा मधुमेह टाळता येतो तसेच कोणत्याही गुंतागुंतीशिवाय महिलेस निरोगी गर्भधारणा अनुभव घेता येतो.


धूम्रपान टाळा : विविध अभ्यासांनुसार, धूम्रपान गर्भाशयाच्या मुखाला कमकुवत करते, ज्यामुळे अकाली प्रसुती आणि गर्भधारणेदरम्यानची गुंतागुंत वाढते. कोणत्याही अडचणीशिवाय गर्भधारणा होण्यासाठी महिलांनी धूम्रपानाची सवय सोडणे गरजेचे आहे.


तणावाचे व्यवस्थापन करा : तणाव हा संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतो, म्हणून गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, योगा किंवा ध्यान धारणा करा, जेणकरुन तुम्हाला तणावापासून दूर राहण्यास मदत होईल.


हायड्रेटेड राहा आणि पूरक आहाराचे सेवन करा : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. भरपूर पाणी प्या तसेच शरीर हायड्रेटेड राखा. संतुलित आहाराचे सेवन करा जे तुमच्या शरीराला गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरेल.


डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा : जर तुम्हाला संसर्गाचे निदान झाले असेल, तर गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन करा. या महत्त्वाच्या टिप्सने महिलांना त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य सुधारणे शक्य होईल. 


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )