Women Health: आज नरक चतुर्दशी. खरं पाहायला गेलं तर धनत्रयोदशीपासून दिव्यांचा सण सुरू झाला आहे. दिवाळीत फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. दिवाळीचा सण आपल्यासोबत आनंद, आपल्या कुटुंबियांसोबत मजा आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्याही घेऊन येतात. अशावेळी गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या आनंदाच्या प्रसंगी, फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांचे नुकसान होण्यापासून वाचता येईल. गरोदर महिलांनाही यावेळी विविध खबरदारी घेण्यास सांगितले जाते कारण या प्रदूषणाचा धूर आई आणि बाळ दोघांसाठीही अत्यंत हानिकारक मानला जातो. दिवाळीच्या काळात गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.


दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करा


तज्ज्ञांचे असे मत आहे की, फटाके फोडताना वातावरणातील हानिकारक वायू श्वासाद्वारे गर्भवती महिलेच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा अनेक वेळा बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ही परिस्थिती गर्भासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय, जर महिलेला ॲलर्जी असेल, दमा किंवा श्वसनाचा इतर कोणताही आजार असेल तर तिला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत महिलांनी घरातच राहून सण साजरा करणे चांगले. बाहेर जावे लागले तरी मास्क वापरा. दम्याचा त्रास असलेल्या महिलांनी त्यांच्यासोबत इनहेलर ठेवावे.


जास्त घरकाम करू नका


घराची स्वच्छता हा दिवाळीतील महत्त्वाचा भाग आहे. स्वयंपाकघरापासून ते बाल्कनीतील रोपांपर्यंत आणि घराच्या आतील भागापर्यंत सर्व काही काम केली जातात. मात्र, आपण गरोदरपणात जास्त घरगुती काम करू नये. याबाबत, खाली दिलेल्या काही टिप्स फॉलो करा.


या चुका चुकूनही करू नका


तुम्ही छोट्या-मोठ्या कामाची जबाबदारी घ्या आणि कुटुंबातील उर्वरित सदस्यांना शारीरिक कामं द्या. तुम्ही दिवे सजवण्याचे काम हाती घेऊ शकता किंवा तुमच्या खोलीला नवीन रूप देण्याचा विचार करू शकता. गर्भवती महिलांनी पायऱ्या चढू नयेत, सजावटीचे काम करू नये किंवा जड वस्तू उचलू नये. गरोदरपणात सहज थकवा येतो, त्यामुळे असे कोणतेही काम करू नका, ज्यामध्ये पडण्याची किंवा घसरण्याची भीती असेल. आपण स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या साफसफाईच्या उत्पादनांपासून देखील दूर राहिले पाहिजे. यामध्ये हानिकारक घटक असू शकतात.


खूप गोड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा


दिवाळी म्हणजे मिठाईचा सण. या दिवशी भरपूर मिठाई आणि फराळ घरी येतो. गर्भवती महिलांनी जास्त गोड आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय कमी खावे आणि वेळेवर खावे. दिवाळीत बाहेरचे पदार्थ खाऊ नका आणि अल्कोहोलपासून दूर राहा. पाहुणे आल्यावर चहा-कॉफीऐवजी लिंबूपाणी, फळांचा रस किंवा मिल्क शेक प्या.


या सुरक्षा टिप्स फॉलो करा


दिवाळीनिमित्त गर्भवती महिलांनी पार्लरमध्ये किंवा कोणत्याही सौंदर्य उपचारासाठी शक्यतो जावू नये. यामध्ये वापरलेले केमिकल्स बालकाला हानी पोहोचवू शकतात. पाहुण्यांच्या पाया पडण्यासाठी वारंवार वाकू नका. दुरूनच फटाके वाजवताना पाहा आणि स्वतः फटाके पेटवू नका. मोठ्या आवाजापासून किंवा फटाक्यांच्या धुरापासून दूर राहा. दिवाळीमुळे स्वतःला जास्त थकवू नका. या दिवशी सैल आणि आरामदायी कपडे घाला.


हेही वाचा>>>


Diwali 2024 Fashion: दिवाळीत गरोदर महिलांचीही नटण्याची खास तयारी! 'या' अभिनेत्रींकडून घ्या टिप्स, दिसाल परफेक्ट


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )