Women Health: रोज रोज तिची कसरत तारेवरची... तू थांब जरा..श्वास घे जरा...थोडं जगून घे... कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन, करिअर अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलांना विविध शारिरीक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. आधी मासिक पाळी..नंतर मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. असे म्हटले जाते की मेनोपॉज लवकर सुरू होणे सुद्धा योग्य नाही. कारण मासिक पाळीमुळे महिलांच्या शरीरातून नेहमी विषारी पदार्थ बाहेर पडतात. पण रजोनिवृत्तीला जास्त उशीर होणे देखील योग्य नाही. अशावेळी तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या महिलांचे वय 45 वर्षानंतर रजोनिवृत्ती होते, त्यांना दमा होण्याचा धोका जास्त असतो. यापूर्वी एका संशोधनात असे आढळून आले होते की लवकर रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो, तर यावेळी उशीरा रजोनिवृत्तीबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घ्या.
संशोधन कुठे झाले आहे?
हे संशोधन टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठातील डर्मलोक केसिबी यांनी केले आहे. या टीमनेच गेल्या वर्षी लवकर रजोनिवृत्तीचे गंभीर परिणाम शोधून काढले होते. या नव्या संशोधनात त्यांनी उशीरा रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये दम्याचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संशोधनात, त्यांना असे आढळून आले की 44 वयोगटातील स्त्रियांच्या तुलनेत 55 वर्षे वयाच्या स्त्रियांना दमा होण्याची शक्यता 66% जास्त असते. या संशोधनासाठी त्यांनी सुमारे 14,000 महिलांची चाचणी केली. याव्यतिरिक्त, हार्मोन थेरपी घेत असलेल्या स्त्रियांना दम्याचा धोका 63% वाढतो.
रजोनिवृत्तीनंतर दम्याची काही प्रमुख कारणे आहेत-
- लठ्ठपणा
- संप्रेरक असंतुलन
- टेन्शन
- झोपेचा अभाव
- मधुमेह किंवा बीपी सारखा कोणताही पूर्व-अस्तित्वात असलेला आजार
दमा कसा टाळायचा?
संशोधकांनी रजोनिवृत्तीनंतर दमा टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत, ज्यात वजन नियंत्रण, हार्मोनल संतुलन, श्वासोच्छवासाचे काही व्यायाम करणे, घरातील हवेची गुणवत्ता स्वच्छ ठेवणे, तणाव टाळणे तसेच पुरेशी झोप आणि हायड्रेशनचा सल्ला दिला जातो. याशिवाय महिलांना रजोनिवृत्ती होताच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे जेणेकरून ते त्यांच्या आरोग्याची तपासणी करू शकतील आणि काही समस्या असल्यास ते वेळेत उपचार सुरू करू शकतील.
हेही वाचा>>>
Women Health: गरोदर महिलांनो यंदा दिवाळीत काळजी घ्या..! 'या' गोष्टी आई-बाळासाठी अत्यंत हानिकारक, कशी घ्याल काळजी? या टिप्स फॉलो करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )