Women Health : काय सांगू..आजकाल खूपचं चिडचिड होतेय गं... सारखा छोट्या गोष्टींवर सुद्धा राग येतो.. काय करू काय कळत नाही? वजन सुद्धा वाढतंय, मी पूर्वीप्रमाणे अजिबात चांगली दिसत नाही.. असे प्रश्न तुमच्याही मनात येतात? मग तुम्हाला PCOS बद्दल माहिती असायलाच हवी.  PCOS म्हणजेच पॉली सिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही महिलांमध्ये एक गंभीर समस्या आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर PCOS मुळे महिलांचे फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही बिघडत चालल्याचं समोर आलंय. याची नेमकी लक्षणं काय आहेत? जाणून घ्या..


 


..यामुळे महिलांचे मानसिक आरोग्यही बिघडते


18 ते 35 वर्षे वयोगटातील महिला याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. या स्थितीत स्त्रीच्या अंडाशयातून अंडी वेळेआधीच बाहेर पडू लागतात आणि नंतर ते सिस्टमध्ये बदलतात. यामुळे अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, केस गळणे, मुरुम आणि गर्भधारणा होण्यास त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर पीसीओएसमुळे महिलांचे मानसिक आरोग्यही बिघडते. त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. ती जाणून घेऊया..


 


PCOS मध्ये महिलांचे मानसिक आरोग्य का बिघडते? लक्षणं काय आहेत?


पीसीओमुळे तणाव निर्माण होऊ शकतो


डॉक्टरांच्या माहितीनुसार स्त्रीच्या प्रजनन चक्रातील प्राथमिक हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन आहेत. परंतु या समस्येमध्ये पुरुष हार्मोन एंड्रोजनची पातळी वाढते आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण कमी होऊ लागते. हार्मोन्सचे चढउतार सेरोटोनिनच्या पातळीवर विपरित परिणाम करतात. हे तुमचा मूड, झोपेचे चक्र आणि भूक नियंत्रित करते. त्यामुळे महिलांमध्ये मूड स्विंग, तणाव आणि चिडचिडेपणा दिसून येतो.


PCOS ग्रस्त महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. पीडित स्त्रिया अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतात ज्यामुळे त्यांना तणाव जाणवू लागतो.


सेरोटोनिन, ज्याला हॅप्पी हार्मोन म्हणून ओळखले जाते, त्याच्या कमतरतेमुळे मूड बदलतो, प्रत्येक संभाषणात राग येतो आणि दुःखी व्हायला होते.


PCOS मुळे शरीरात अनेक बदल होतात जसे की वजन वाढणे, पुरळ आणि केस गळणे. या सर्व गोष्टी पाहून महिलांना तणाव जाणवू लागतो


 हळूहळू चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या निर्माण होतात. महिला स्वत:ला शारीरिकदृष्ट्या कमी आकर्षक मानू लागतात.


 


उपाय काय?


योग्य जीवनशैलीचे पालन करा, व्यायामाप्रमाणे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.


योग्य आहार घ्या. तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे सेरोटोनिनची पातळी कायम राहते.


तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग करा.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Women Health : ऑफिसचं काम, सोबत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, कसं करू मॅनेज? या 5 टिप्स फॉलो करा