Breast Cancer: अशा अनेक महिला आहेत, ज्या एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात, त्यांचं करिअर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन यासारख्या विविध गोष्टींमुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. आजकाल आपण पाहतोय, भारतातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्यपणे आढळणारा असा कर्करोग आहे, त्याचा उच्च मृत्युदर पाहता हा सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर चिंतेचा विषय बनत चालला आहे. यासंदर्भात डॉक्टरांचे म्हणणे आहे की, स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनांमध्ये गाठ असणे, मात्र इतरही अशी काही लक्षणं आहेत, ज्याबद्दल अनेक महिलांना माहित नसते. आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या...


2045 पर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यता?


भारतातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि त्यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे, ज्यामुळे तो गंभीर सार्वजनिक आरोग्य चिंतेचा विषय बनतो. ICMR अभ्यासानुसार, 2045 पर्यंत भारतात स्तनाच्या कर्करोगाचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टप्प्यावर या कर्करोगाच्या लक्षणांबद्दल माहीत करून घेतल्यास उपचारांचे परिणाम सुधारू शकतात आणि रुग्णांचे आयुर्मान वाढू शकते. AIIMS, दिल्लीचे डॉ. अभिषेक शंकर यांच्या मते, "स्तनाच्या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये स्तनांमध्ये गाठ, काखेच्या किंवा मानेच्या हाडाजवळ सूज येणे, स्तनाग्रातून स्त्राव आणि त्वचेचा रंग बदलणे यांचा समावेश होतो. 


स्तनाचा आकार आणि स्तनाग्र बदल


आरोग्य तज्ज्ञ सांगतात, "त्वचा किंवा स्तनाग्र लालसर होणे, स्तनाग्र आतील बाजूस वळणे, स्तनाच्या आकारात बदल होणे आणि स्तन दुखणे ही देखील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात, ICMR च्या मते, 2022 मध्ये भारतातील एकूण महिला कॅन्सरपैकी 28.2 टक्के स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण होते. स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी 5 वर्षांचा जगण्याचा दर 66.4 टक्के आहे.


मॅमोग्राफीच्या तपासणीचे महत्त्व


आरोग्य तज्ज्ञ सांगतात, मॅमोग्राफी ही स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि सुरुवातीच्या टप्प्यावर निदान करण्यासाठी सर्वात स्टॅंडर्ड चाचणी आहे, जी मृत्यू दर कमी करण्यास मदत करते. 2024 मधील यूएस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वयाच्या 40 व्या वर्षापासून प्रत्येक 2 वर्षांनी मॅमोग्राफीची शिफारस केली जाते. बऱ्याच वेळा स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतात, म्हणून मॅमोग्राफी किंवा स्तन एमआरआयद्वारे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. "यामुळे मृत्युदर 30 टक्क्यांहून अधिक कमी होतो."


स्तनाच्या कर्करोगाचा धोका कसा कमी करायचा?


आरोग्य तज्ज्ञ सांगतात, काही जोखीम घटक बदलल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करणे शक्य आहे. यामध्ये उशीरा विवाह, उशीरा बाळंतपण, मूल न होणे आणि तोंडी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यांचा समावेश होतो. हार्मोनल टॅब्लेटसह केमोप्रोफिलॅक्सिस उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असू शकते, परंतु संभाव्य दुष्परिणामांमुळे सामान्यतः शिफारस केली जात नाही.


जीवनशैलीतील बदलांमुळे धोका कमी करता येतो?


आरोग्य तज्ज्ञ सांगतात, कौटुंबिक इतिहास असल्यास डॉक्टर अनुवांशिक चाचणी घेण्याची शिफारस करतात. इतर जोखीम-कमी करण्याच्या उपायांमध्ये निरोगी जीवनशैली जगणे, फायबर आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहार घेणे आणि अल्कोहोल आणि लाल मांस टाळणे यांचा समावेश आहे.


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो... Thyroid चा त्रास आहे? गर्भधारणाही होत नाही? अनेक समस्या येतायत? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या... 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )