Women Health: ते म्हणतात ना, जन्म बाईचा...खूप घाईचा... त्याचप्रमाणे महिलांना त्यांच्या वाढत्या वयानुसार विविध मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. एका वेळेस अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही महिला त्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतात. नुकतेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, एक असं मोठं कारण आहे, ज्यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदना (डिसमेनोरिया) होण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर..
महिलांमध्ये 'ही' समस्या वाढतेय..
महिलांच्या मासिक पाळी संदर्भात एक नवे संशोधन झाले, ज्यात संशोधकांनी महिलांचे मानसिक आरोग्य आणि पुनरुत्पादक आरोग्य यांच्यातील खोल संबंधाची पुष्टी केली आहे. यात एक असं मोठं कारण आहे, ते म्हणजे नैराश्यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदना (डिसमेनोरिया) होण्याची शक्यता असते. मात्र, मासिक पाळीच्या वेदनांमुळे नैराश्य येत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. संशोधनातून समोर आलेली आकडेवारी दर्शवते की, स्त्रियांमध्ये डिप्रेशन म्हणजेच नैराश्याची समस्या पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. नैराश्याने पीडित महिलांना केवळ मानसिकच नाही, तर गंभीर शारीरिक लक्षणांनाही सामोरे जावे लागते.
नैराश्य आणि मासिक पाळीच्या वेदना यांचा संबंध काय?
चीन आणि ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे या विषयावर संशोधन केले. ज्यात नैराश्य आणि मासिक पाळीच्या वेदना यांच्यातील संबंधांवर प्रभाव टाकणारी गुणसुत्रे ओळखण्यासाठी त्यांनी अनुवांशिक फरकांचे विश्लेषण केले.
झोपेची भूमिका महत्त्वाची
संशोधनानुसार, नैराश्य आणि मासिक पाळीच्या वेदनांमध्ये झोप देखील महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, झोपेचा त्रास मासिक पाळीच्या वेदना वाढवू शकतो. यावरून असे दिसून येते की, या दोन्ही समस्या समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी झोपेच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज
संशोधकांनी असे सुचवले आहे की, मानसिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्यावर उपचार करताना सर्वांगीण दृष्टीकोन पाहणे गरजेचे आहे. मानसिक विकार आणि मासिक पाळीच्या वेदनांना वेगळे न पाहता एकमेकांशी जोडले गेले पाहिजे.
मानसिक आरोग्य तपासणीचे महत्त्व
संशोधक शुहे लिऊ यांनी म्हटले की, ज्या महिलांना मासिक पाळीच्या तीव्र वेदना होत असतील, अशा महिलांसाठी मानसिक आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांच्या उपचारात मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. नैराश्य आणि मासिक पाळीच्या वेदना यांच्यातील संबंध हा एक जटिल परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे. हे संशोधन महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारण्याच्या गरजेवर भर देते.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळीच्या किती दिवसांनंतर गर्भधारणा शक्य असते? योग्य वेळ अनेकांना माहीत नाही, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )