Winter Travel: रोजच्या कामाचा कंटाळा आला? दररोज ते काम, त्याच जबाबदाऱ्या, कुटुंबाला वेळ देता येत नाही. पण जर तुम्ही ठरवलं तर हिवाळ्याची गुलाबी थंडी तुम्ही अनोख्या पद्धतीने अनुभवू शकता. तसं पाहायला गेलं तर मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की दैनंदिन कामापासून आणि शहरातील गजबजाटापासून दूर, लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबासोबत हिल स्टेशनवर सुट्टी घालवण्यासाठी जातात. मात्र जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही इथली ही सुंदर हिल स्टेशन्स एक्सप्लोर केलीच पाहीजे. इथल्या निसर्गाची नजारे तुम्हाला भुरळ घालतील.


 


उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीर विसराल..! महाराष्ट्रातच आहे ना सुंदर हिल स्टेशन्स


जेव्हा कधी हिल स्टेशन्सला भेट देण्याचा विचार येतो तेव्हा मनात पहिली नावे येतात ती म्हणजे उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू आणि काश्मीर. उन्हाळा असो की हिवाळा, लोकांना हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते. तिथले निसर्गरम्य दृश्य लोकांना भुरळ घालते. विशेषत: धकाधकीच्या आणि तणावाने भरलेल्या आयुष्यात, लोकांना स्वतःसाठी थोडा वेळ काढून कुटुंब किंवा मित्रांसह हिल स्टेशनवर जायला आवडते. शहराच्या गर्दीपासून दूर असलेल्या हिल स्टेशनवर शांत वातावरणात वेळ घालवणे आणि ताजी हवा घेणे, हे मन आणि शरीर दोन्हीसाठी चांगले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की महाराष्ट्रातही असे अतिशय सुंदर हिल स्टेशन्स आहेत. जर तुम्ही मुंबईला राहत असाल किंवा महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही इथल्या हिल स्टेशन्सला भेट देऊ शकता. ज्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत तुमची ट्रीपही होईल फर्स्ट क्लास..!


लोणावळा


लोणावळ्याचं नाव तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकदा ऐकलं असेल. हे महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. विशेषतः जर एखाद्या व्यक्तीला ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे. हिरवेगार गवत, मोठे पर्वत, धबधबे आणि गुहा याशिवाय येथे ट्रेकिंग आणि हायकिंग पॉइंट्स आहेत. लोणावळ्यात तुम्हाला अनेक प्रकारचे साहसी उपक्रम करण्याची संधी मिळू शकते. कोरेगड किल्ला, टायगर लीप, ड्यूक नोज यांसारखी ठिकाणे एक्सप्लोर करा आणि कोंडाणे लेण्यांचा ट्रेक करा. याशिवाय तलावात बोटिंगला जाता येते.



इगतपुरी


तुम्ही पुणे किंवा मुंबईत रहात असाल तर तुम्ही इगतपुरी हिल स्टेशनला भेट देऊ शकता. येथील निसर्गाचे सुंदर नजारे तुमचे मन जिंकतील. घाटनदेवी मंदिर, त्रिंगलवाडी किल्ला, अमरेश्वर मंदिर, म्यानमार गेट, भातसा रिव्हर व्हॅली, इगतपुरी वॉटर स्पोर्ट्स रतनगड किल्ला, मानस मंदिर याशिवाय येथे सर्वात मोठी विपश्यना ध्यान अकादमी आहे.


कोरोली


कोरोली हिल स्टेशन देखील महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता. या हिल स्टेशनवर तुम्हाला फारशी गर्दी दिसणार नाही. इथली हिरवीगार शेतं आणि सुंदर दऱ्या तुम्हाला भुरळ घालतील. इथले वातावरण सर्वत्र आल्हाददायक असते. पण मुख्यतः सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते जून या काळात या ठिकाणी जाण्याची मजा द्विगुणित होते.


भंडारदरा


हे हिल स्टेशन मुंबईपासून 166 किमी अंतरावर आहे. वीकेंडला मित्र किंवा कुटूंबासोबत इथे जाण्याचा प्लॅन बनवला जाऊ शकतो. इथे हिरवाईने नटलेले पर्वत तसेच सुंदर धबधबे मनाला भुरळ घालतील. हे महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक हिल स्टेशन्सपैकी एक आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग देखील करू शकता. भंडारदरा येथे पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. विल्सन डॅम, अंब्रेला फॉल्स, रंधा फॉल्स, आर्थर लेक, माऊंट कळसूबाई आणि रतनवाडी व्हिलेज अशा अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.


 


 


हेही वाचा>>>


Winter Travel: हिवाळा सुरू होण्यापूर्वी ट्रीपला जायचंय? 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, Pre-Winter Vacation साठी परफेक्ट!


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )