मुंबई: अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी वांद्रे (Bandra) येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या केली होती. सिद्दीकींच्या (Baba Siddique Murder) हत्येचा कट कसा रचण्यात आला, याविषयी पोलिसांन एक-एक करुन धागेदोरे सापडत आहेत. अशातच आता यंदाच्या मे महिन्यात घडलेला प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला आहे. मे महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमागील सूत्रधार कोण आहे आणि त्याचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याचा शोध आता मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.


मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  21 मे रोजी बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची बातमी पसरली होती. त्यानंतर पत्रकारांनी पोलिसांना फोन करायला सुरुवात केली. बाबा सिद्दीकींच्या घरावर गोळीबार (Siddique gun firing) झालाय, ते सुरक्षित आहेत का, असे प्रश्न पत्रकार पोलिसांना विचारत होते. अनेक पत्रकारांचे फोन आल्यानंतर पोलिसांनी खरोखरच काही घडले आहे का, हे तपासण्यासाठी एक पथक बाबा सिद्दीकी यांच्या घराच्या दिशेने धाडले. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनाही संपर्क करण्यात आला. तेव्हा त्यांनी मी लंडनमध्ये असून सुरक्षित असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.


त्यावेळी पोलिसांनी हा विषय निव्वळ अफवा आहे म्हणून सोडून दिला नाही तर वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरच्या परिसराची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना कुठेही बंदुकीतील गोळीच्या पुंगळ्या किंवा अन्य कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही संशयास्पद व्यक्ती दिसून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी हा तपास तिथेच थांबवला होता. मात्र, आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हे प्रकरण पोलिसांनी पु्न्हा उकरुन काढले आहे. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या घरावरील हल्ल्याची आवई कोणी उठवली होती, त्या अफवेचा सिद्दीकींच्या हत्येशी कोणता संबंध आहे का, याचा शोध सध्या मुंबई पोलीस घेत आहेत. 


बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलिसांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत फेरआढावा


बाबा सिद्दीकी हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा विभागाची विशेष बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेमध्ये काही चूक झाली होती का ? याचीही तपासणी सुरू आहे. तसेच सिद्दीकी यांची हत्या, तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेरआढावा घेण्याचे काम सध्या सुरु आहे.


यावेळी पोलीस सुरक्षारक्षकांनी त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. अनेक वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा रक्षकांच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्याच सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा रक्षकांना दुसऱ्या मोटरगाडीत बसवून प्रवास करतात. अचानक एखाद्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतात. सुरक्षा रक्षकाने त्यांच्या सूचना ऐकल्या नाहीत तर त्यांची तक्रार करून बदली करण्याची मागणी करण्यात येते, असे सूत्रांनी सांगितले.


बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर कोणत्याही परिस्थिती सुरक्षा रक्षकांना नियमावलीचे पालन करण्याचे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. तसेच सूचना न ऐकणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आदरपूर्वक सुरक्षेच्यादृष्टीने संबंधित कृती कशी घातक ठरू शकते, याची कल्पना द्यावी, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


आणखी वाचा


खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली