Winter Health Tips : हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. वातावरणात हळूहळू थंडावा जाणवू लागला आहे. खरंतर अनेकांना हिवाळा ऋतू आवडतो पण या ऋतूत आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक समस्या देखील उद्भवतात. थंडीच्या दिवसांत काही आजारांचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हिवाळ्यात कोणत्या आजारांचा धोका वाढतो आणि या थंडीच्या दिवसांत कोणत्या लोकांना विशेषतः सावध राहण्याची गरज आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


हिवाळ्यातील आजार   


हिवाळ्यात अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात. हे जीवाणू श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि शरीराला आजारी बनवतात. यामुळे, श्वसन संक्रमण फार लवकर आणि मोठ्या प्रमाणावर पसरते. अशा स्थितीत थंडीबरोबरच फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. याशिवाय ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या ऋतूमध्ये न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे दमा आणि ब्राँकायटिससारखे आजार होतात. हिवाळ्याच्या काळात मायग्रेनचे दुखणेही अधिक वेगाने सुरू होते. ज्यांना आधीच डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांना या हंगामात मायग्रेनचा झटका येण्याचा धोका असतो. याशिवाय ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे, त्यांचे बीपी या ऋतूमध्ये अधिक वाढू शकते. खरं तर, थंडीच्या दिवसांत कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या पातळ होतात. त्यामुळे बीपी वाढतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा योग्य प्रवाह होण्यास अडचण येते.


या लोकांनी विशेष काळजी घ्यावी  


हिवाळ्याच्या काळात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनीही यावेळी विशेष काळजी घ्यावी. या ऋतूत लहान मुलांना सहज न्यूमोनिया होतो, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. ज्या लोकांना दमा, ब्राँकायटिस किंवा श्वसनाचे आजार आहेत त्यांनीही या ऋतूत त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहणं गरजेचं आहे. अशी जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही आजारी पडणार नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं