Winter Health Tips : थंडीच्या दिवसात हृदय रोगांचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. या दिवसात अधिक थंडीमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचीही शक्यता असते. अशा वेळी योग्य ती काळजी घेतली तर हा धोका टाळता येऊ शकतो. तापमानात घट झाल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढू शकते किंवा कदाचित मृत्यू देखील ओढावू शकतो. हृदयविकाराचा झटका हे जागतिक स्तरावर मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरते आहे. हृदयरोगींनी हिवाळ्याच्या दिवसात आपल्या हृदयाचे आरोग्य जपणं गरजेचं आहे. 


थंड हवामानाचा तुमच्या हृदयावर कसा परिणाम होतो?


या संदर्भात, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे डॉ. ऋषी भार्गव यांनी असे सांगितले आहे की, थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि अरुंद होतात. यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन हृदयावरील ताण वाढतो. यामुळे रक्तदाबही वाढू शकतो. या परिस्थितीमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.



  • हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीराचे तापमान देखील कमी होते. त्यामुळे हृदयाला अधिक रक्त पंप करण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात, ज्यामुळे त्यावर अधिक भार येतो.

  • थंड हवामानामुळे कोरोनरी आर्टरी अरुंद झाल्यामुळे एन्झाईनची तीव्रता वाढते.

  • तेलकट, गोड पदार्थाचा होणार मारा तसेच , नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्टी, अवेळी खाणे, मद्यपान करणे आणि झोप न लागणे यामुळे हृदयावर खूप ताण येतो.

  • अनेकदा आळस आल्यामुळे आपण व्यायाम टाळतो. अशा वेळी लोक घरामध्येच राहणं पसंत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधित रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते.


सर्दी, घसा खवखवणे, खोकला यांसारखे किरकोळ आजारही हिवाळ्यात होतात. जरी हे आजार सौम्य वाटत असले तरी ज्यांच्या हृदयावर आधीच इतर कारणांमुळे ताण आहे अशा व्यक्तीसाठी ते खूप धोकादायक ठरु शकतात.


'अशी' घ्या काळजी


थंड वातावरणात बाहेर जाताना उबदार कपडे घालायला विसरु नका. उबदार मोजे तसेच शूजचा वापर करा आणि थंड वातावरणात आपले हात आणि कान झाकण्याचा प्रयत्न करा.


अतिश्रम टाळा


थंडीत जास्त श्रमाची कामं करू नका. जास्त वेगाने चालणे किंवा बाहेरील कोणत्याही कठोर शारीरिक हालचाली टाळा. कारण या हालचालींमुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि अचानक मृत्यू देखील ओढावू शकतो.


मद्यपान आणि अस्वस्थ जीवनशैली टाळा


यामुळे तुमच्या त्वचेच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि ऱ्हदयविकाराच्या समस्या सतावतात. भरपूर पाणी प्या. थंड हवामानामुळे होणारे निर्जलीकरण हे चयापचय प्रणालीवर ताण निर्माण करतात. हलका व सहज पचणाऱ्या आहाराचे सेवन करा. सुट्टीच्या दिवसात आणि उत्सवकाळात मिठाई, खारट आणि तेलकट पदार्थांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या.


फ्लू लसीकरण करा


हिवाळ्यात फ्लू होण्याचा धोका वाढतो कारण या दिवसांत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांना फ्लूचा धोका अधिक असतो. तुम्हाला फ्लूची लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय