नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत असून, शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा होणार आहे. अवकाळी पाऊस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) शुक्रवारी घोषणा करणार असल्याचं मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या घोषणेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळण्याची शक्यता आहे. 


राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केले होते. त्यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना, आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.  


मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचं लक्ष? 


आधीच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामासोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसान भरपाईची घोषणा केली जाणार आहे. मात्र, ही नुकसान भरपाई किती असणार आह? या घोषणेचं शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे?, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे 


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल...


दरम्यान, याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. "शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र सरकार मदत करत नाही. राज्यात बळीराजा प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधान सभेतून पळ काढता येणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Onion Price : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन तयार, शेतकऱ्यांना दिलासा देणारा 'हा' मोठा निर्णय घेतला