नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गानं सर्वांनाच अडचणीत टाकलं. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशाच संकटांमध्ये सर्वजण अडकले आहेत. यामध्ये मानसिक तणावाचा सामना अनेकांनीच केला. अनेकांसाठी हा अस्वस्थपणा शब्दांतही व्यक्त करणं कठीण. कित्येकदा कोरोनाची गंभीर लक्षणं नसली आणि तरीही रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह येतो. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं यावर भर देण्यापेक्षा मन विचलित होतं. पण, अशा परिस्थितीत घाबरुन न जाता घरच्या घरीच काही उपाय करत कोरोनावर आणि या अस्वस्थतेवर मात करता येऊ शकते. 


विलगीकरणात जा - घसा खवखवणे, हलका खोकला, ताप, अतिसार यांसारख्या कारणांमुळे प्रचंड थकवा येतो. तुम्हाला अशी कोणतीही लक्षणं असतील तर, तातडीने विलगीकरणाचा अवलंब करा. कोरोना चाचणीचा अहवाल येण्याची वाट पाहू नका. सहसा कोरोना रुग्णांना सुरुवातीलाच सावधगिरी बाळगली तर रुग्णालयातही जावं लागत नाही. 


डॉक्टरांचा सल्ला घ्या- दूरध्वनीवरुन संपर्क साधून डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर तुम्हाला यावरील उपाय योग्य पद्धतीने सांगू शकतात. यामुळे तुम्हाला गृह विलगीकरणात कोरोना नियंत्रणात आणण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय सांगू शकतात.


Tips: जाणून घ्या Oximeter वापरण्याची योग्य पद्धत 


ऑक्सिजन पातळी तपासत राहा- पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने तुम्हा ठराविक तासाच्या फरकानं ऑक्सिजनची पातळी तपासत राहा. हे ऑक्सिमीटर कसं वापरावं याबाबतही मार्गदर्शक सूचना अनेकदा देण्यात आल्या आहे. मुख्य म्हणजे या सर्व परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 




शरीराचं तापमान तपासणं, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण, नियम आणि निर्बंधांचं पालन करणं आणि परिस्थितीचा धीरानं सामना करणं यांमुळे अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. वैद्यकिय उपचारांसमवेत मानसिक शांतताही या दरम्यानच्या काळात तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं या आव्हानात्मक काळात आपली आणि इतरांची अतिशय जबाबदारीनं काळजी घ्या.