Kunku : कपाळावर कुंकू लावण्यामागचं शास्त्र काय? आयुर्वेद काय सांगतं?
Ayurveda : हळद आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण वाळवून कुंकू तयार केलं जायचं आणि ते दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लावलं जायचं.
मुंबई: संभाजी भिडे यांनी कुंकू लावण्यावरुन वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया आल्या. वाद काहीही असला तरी आपल्या संस्कृतीत कुंकू हा विषय फार गहण आहे. कपाळावर कुंकू लावणं म्हणजे सौभाग्याचं लेणं असल्याचं समजलं जातं. मग या कुंकवाचा इतिहास काय? ते कपाळावर लावण्यामागे नेमकं कारण काय? पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे काही शास्त्र आहे का? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले.
कुंकू कशापासून बनतं?
सर्वात महत्वाचा मुद्दा हा की कुंकू बनतं कशापासून? त्याचं आरोग्याशी काय घेणं देणं? तर आधी हे कुंकू हळदीपासून तयार केलं जायचं. हळद आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण वाळवून ते कुंकू म्हणून वापरलं जायचं. हे कुंकू कुठं लावायचं याचीही जागा ठरवली गेली. म्हणजे मुलीच्या लहानपणीच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी गोंदण केलं जायचं. त्या गोंदणाच्या गोल ठिपक्यावर कुंकू लावलं जायचं. काळ बदलत गेला तसं कुंकवाचींजागा टिकलीने घेतली.
आयुर्वेद काय सांगतं?
ज्या ठिकाणी कपाळावर दोन भुवयांच्यामध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते, त्याच्या पाठीमागे असते आज्ञाचक्र. योगगुरु पतंजलींनी योगशास्त्रात जी षटचक्र सांगितली आहेत त्यातलं हे सहावं आणि खूप महत्वाचं चक्र. मेंदूतल्या त्याच ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आज्ञा दिल्या जातात असं आयुर्वेदात सांगितलं जातं. ध्यान करताना आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. म्हणजे कपाळावर नाही तर कपाळाच्या मागच्या बाजूला.
संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी जबाबदार असणारा मज्जातंतू म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्ह. हा मज्जातंतू याच भागात आहे. म्हणजेच दोन भुवयांच्या मध्यभागी. त्या मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा आहेत. या जागेवर दाब पडल्याने सायनसचा त्रास कमी होतो.
डोळ्यांच्या महत्त्वाच्या नसा देखील याच भागात असतात आणि या नसा डोळ्यांच्या स्नायुंशी जोडलेल्या असतात. म्हणूनच या ठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
आपल्यावर जेव्हा एखादं काम करण्याचा ताण असतो किंवा कुठली चिंता सतावत असते, त्यावेळी ते आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. आपल्या कपाळावर आठ्या पडतात. म्हणजेच आपल्या शरीरातला सगळ्या गोष्टींचा ताण हा त्या बिंदूच्या ठिकाणी जमा होतो. म्हणूनच त्या बिंदूला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपला ताण कमी होतो, दृष्टी सुधारेल आणि निद्रानाशही कमी होतो. त्यामुळे हे सगळे मुद्दे बघितले तर ॲक्यूप्रेशरपासून ते योगाभ्यासापर्यंतच्या सगळ्या बाजू कुंकू लावण्यामागचं शास्त्र स्पष्ट करतात.