Valentine week 2021: प्रेम व्यक्त करताना काही वेळा शब्द अपुरे पडतात...काही वेळा मनात असूनही भावना व्यक्त करता येत नाहीत. काही वेळा प्रेमात नुसता चंद्र-सुर्यांच्या कल्पना करता-करता वेळ निघून जातो. मग एक वेळ अशी येते की हे सारं थांबवावं...ही कोंडी फोडावी. मग ती कुसुमाग्रजांची कविता आठवावी. 'मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा...सांग तिला... तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.' प्रेम व्यक्त करण्याचा 'मिठी' हा एक निशब्द मार्ग आहे. 


वॅलेंटाईन वीक मध्ये आतापर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि प्रॉमिस डे पार पडले आहेत. आता याच्या पुढचा अंक म्हणजे 'हग डे', अर्थात मिठी दिवस. प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख ते काय असेल. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस खासच आहे.


एखाद्याला प्रेमाने मिठीत घेतल्यास नात्यातील गोडवा अगदी मुरांब्याप्रमाणे मुरत जातो. 


जादू की झप्पी
मिठीची जादू किंवा ताकत काय असते हे मिठीत घेणाऱ्याला आणि मिठीत सामावून जाणाऱ्यालाच असते. 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटातील जादू की झप्पी आपल्याला चांगलीच माहिती आहे. एखाद्याला मिठी मारल्यामुळे किंवा मिठीत घेतल्याने समोरच्या व्यक्तीचा रागही कमी होतो अन् प्रेमही वाढते.


भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग
अनेकदा अनेकांना आपले प्रेम आणि आपल्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत. मग त्यांची प्रचंड कोंडी होते, अस्वस्थता वाढते. मग त्या भावना व्यक्त करण्यासाठी धाडस करावं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारावं. एखाद्याच्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात. मग एखाद्याला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.


मिठी मारल्याने ऑक्सिटॉक्सिन हार्मोनची निर्मीती
मिठी फक्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीनेच मारावी असं काही नाही. त्यामागे अनेक भावना असू शकतात. एखाद्याला मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीचा तणाव कमी होण्यास मदत होते. एखादा व्यक्ती मानसिक तणावात असेल आणि त्याला कोणीतरी मिठी मारली तर त्याच्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन तयार होते आणि ते रक्तात मिसळते असं विज्ञान सांगतंय. त्यामुळे त्या व्यक्तीचा ताण निवळण्यास मदत होते. तसेच या हार्मोनमुळे रक्त दाब कमी होतो, हृदयासंबंधी आजारही कमी होतात. रक्ताभिसरनाची प्रक्रिया वाढते, मूड फ्रेश होतो आणि मनात आपलेपणाची भावना निर्माण होते ती वेगळीच


मिठी म्हणजे प्रेम अन् काळजी
मिठी मारणे म्हणजे काळजी, प्रेम व्यक्त करणे. एखाद्या व्यक्तीला एकाकीपणा वाटत असेल तर तो मिठी मारल्याने दूर होतो, त्याचं नैराश्य कमी होतं. मिठी मारल्याने नात्यातील गोडवा वाढतो. प्रेमाची अप्रतिम भावना म्हणजे मिठी होय. त्यामुळे आपले प्रेम, मित्र, परिवार आणि इतर लाडक्या लोकांना आजच्या दिवशी मिठी मारा आणि आपुलकीची भावना वाढावा.


लग जा गले...
प्रेमाविरांसाठी आजचा दिवस खास. आजच्या दिवसाच्या माध्यमातून त्याने किंवा तिने आपल्या प्रेमाला आपण आयुष्यभर तुला साथ देणार, तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात सामील होणार, आपल्या या कोवळ्या नात्याला आयुष्यभर जपणार असा दृढविश्वास दिला पाहिजे. अशी एक संधी 'हग डे' च्या माध्यमातून चालून आली आहे. तर प्रेमविरानो, ही संधी गमावू नका.


सांग तिला... तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..... असं सांगत कवी कुसुमाग्रजानी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रेमविरांना आवाहन केलंच आहे.


शब्दांच्या या धुक्यामधे अडकू नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.


उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं…


महत्त्वाच्या बातम्या: