Hidden Gem Travel : हिरवंगार जंगल... जिकडे तिकडे पक्ष्यांचा आवाज...चहुबाजूस निसर्गच निसर्ग आणि फक्त पाण्याचा खळखळण्याचा आवाज.. आहाहा.. असं आपसुकच तुमच्या तोंडातून निघेल, जर तुम्ही पावसाळ्यात हिरव्यागार जंगलात लपलेल्या या धबधब्याला भेट द्याल.. विश्वास ठेवा, हा धबधबा म्हणजे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. 20 फूट उंचीवरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा त्याची भुरळ तुम्हाला निश्चितच पडेल. महाराष्ट्रातील 'हा' धबधबा म्हणजे निसर्गाची एक चित्तथरारक देणगी आहे, जी तुम्हाला वेड लावेल. जाणून घ्या या धबधब्याबद्दल..



महाराष्ट्रातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक..! डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य


आम्ही ज्या धबधब्या बद्दल बोलत आहोत, तो म्हणजे भिवपुरी धबधबा...शहरी जीवनातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ विश्रांती घेऊन जेव्हा तुमची पाऊलं निसर्गाच्या दिशेने चालतात. तेव्हा तुम्ही ताण, थकवा या सर्व गोष्टी विसरता.. आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक असलेल्या या भव्य धबधब्याला भेट द्याल तेव्हा याचे भव्य दृश्य तुमचे मन मोहेल. हा धबधबा मुंबई-पुणे पासून जवळ कर्जत तालुक्यातील भिवपुरी या छोट्या शहरामध्ये आहे. इथला परिसर धबधब्यांसाठी ओळखला जातो आणि अनेक पर्यटकांचे आठवड्याच्या शेवटी, विशेषत: पावसाळ्यात भेट देण्याचे आवडते ठिकाण आहे. भिवपुरी हे छोटेसे गाव असले तरी त्याचे येथे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याला भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन म्हणतात. बहुतेक जण तुम्हाला भिवपुरी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कर्जत येथे उतरण्याचा सल्ला देतात, परंतु अनेकांना माहित नाही की,  तुम्ही भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर देखील उतरून धबधब्याकडे जाऊ शकता.





धबधब्याला भेट देण्याचा उत्तम काळ कोणता?


भिवपुरी धबधब्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर. याचा अर्थ आता भेट देण्याची सर्वोत्तम वेळ आहे! हे एक लोकप्रिय ठिकाण आहे, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी या ठिकाणी लोकांची गर्दी असते. साहसी प्रेमींनाही हे ठिकाण आवडत,  कारण पावसाळ्यात हे धबधबे रॅपलिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. हा धबधब्याचे पाणी सुमारे 20 फूट उंचीवरून कोसळते. जे खालच्या खडकांवर आदळते, हे दृश्य फारच मनमोहक असते. थोडं जवळ गेलं तर पाण्याच्या फवाऱ्यात भिजून या थराराचा आनंद लोक अनेकदा घेतात. पण धबधब्याने तयार झालेल्या पाण्याच्या डबक्याजवळ जास्त जाऊ नका. कारण असे करणे जीवघेणे ठरू शकते.




कसे पोहचाल?


खरं तर भिवपुरी रेल्वे स्थानकापासून पायी प्रवास खूप सुंदर आहे. जिथे नजर टाकाल तिथे हिरवळच हिरवळ आहे. डोंगर उतारावर लहान नद्या वाहतात, ज्याचे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. तुम्ही कर्जतहून भिवपुरी धबधब्याला जाण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमच्या डेस्टीनेशनवर जाण्यापूर्वी येथील प्रसिद्ध, स्वादिष्ट वडा पाव चाखण्याचा फायदा मिळेल. खवय्ये असाल तर कर्जतला उतरताना हे करायलाच हवं. या वडापावची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मुंबईपासून साधारण 102 किलोमीटर आणि पुण्याहून 149 किलोमीटर इतके अंतर आहे, तुम्हाला रेल्वेने जायचे असल्यास मुंबईहून सेंट्रल लाईनवर कर्जतला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढा आणि कर्जतला उतरा. ऑटो स्टँडच्या दिशेने पूर्वेकडे जा आणि रिक्षाने धबधब्याकडे जा. तिथे पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.




कुठे राहायचे?


जर तुम्ही वीकेंड सहलीची योजना आखत असाल, तर कर्जतमध्ये राहण्याचे अनेक पर्याय आहेत, जे भिवपुरीच्या सर्वात जवळ आहे. किंवा तुम्ही भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन जवळ हॉटेल्स शोधू शकता. जे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनपासून साधारण 23 किमी अंतरावर आहे.


 


 


हेही वाचा>>>


Travel : एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य.. निसर्गाची साद अन् जोडीदाराची साथ.. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात 'या' ठिकाणाला


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )