Travel : चैत्र नवरात्र सुरू आहे. ठिकठिकाणी देवीचा जागर सुरू आहे. या दिवसात देवीची महती गायली जाते. साऱ्या विश्वाची आई आपल्या पृथ्वीवर अवतरते. तिच्या येण्यानं सारं काही मंगलमय होते. पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे तुकडे केले, तेव्हा देवी सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर जेथे पडले, त्या ठिकाणी शक्तीपीठांची स्थापना झाली. त्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मातेच्या शरीराचे अवयव पडले. अशा प्रकारे मातेची एकूण 51 शक्तीपीठे बांधण्यात आली. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. ही कोणती शक्तीपीठं आहेत जी परदेशात आहेत? जाणून घ्या...


 


केवळ भारतातच नाही, तर परदेशातही शक्तीपीठं


देवीची शक्तीपीठे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. नवरात्रीच्या काळात मातेचे भक्त केवळ भारतातच नाही तर परदेशातही मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. भारताशिवाय मातेचे शक्तिपीठ फक्त पाकिस्तानात आहे, असे अनेकांना वाटते. पण तसे नाही, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त विविध देशांमध्ये असलेल्या मातेच्या शक्तीपीठांची माहिती देणार आहोत.




 


परदेशात मातेचे शक्तीपीठ कोठे आहे?


मनसा शक्तीपीठ, तिबेट


माता सतीच्या शरीराचा एक भाग तिबेटच्या मानसरोवर काठावर पडला होता. त्यानंतर या मातेच्या शक्तीपीठाला मानसा शक्तीपीठ असे नाव पडले. येथे मातेच्या उजव्या हाताचा तळवा पडला होता, असे मानले जाते. मनसा देवी भगवान शंकराची मानस कन्या म्हणून पूजली जाते. परदेशातील हे मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे.




 
नेपाळ शक्तीपीठ


नेपाळमध्ये सध्या मातेची 3 शक्तीपीठे आहेत. नेपाळमधील गंडक नदीजवळ आद्य शक्तीपीठ आहे. येथे देवीच्या मानेचा डावा भाग पडला होता असे मानले जाते. येथे मातेच्या गंडकी रूपाची पूजा केली जाते.


गुहेश्वरी शक्तीपीठ - हे मंदिर पशुपतीनाथ मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही दोन मंदिरांना एकत्र भेट देऊ शकता. येथे आईचे गुडघे पडले होते असे मानले जाते.


दंतकाली शक्तीपीठ- मातेचे हे मंदिर नेपाळमधील विजयपूर गावात आहे. इथे आईचे दात पडले होते. त्यामुळे या मंदिराला दंतकाली शक्तीपीठ असे नाव पडले.




इंद्राक्षी शक्तीपीठ, श्रीलंका


या ठिकाणी आईचे पैंजण पडले होते. हे मंदिर श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे आहे. हे मंदिर लंका-इंद्राक्षी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. राजधानी कोलंबोपासून 250 किमी अंतरावर त्रिकोन मालीच्या टेकडीवर हे मंदिर आहे. हे मातेचे प्रसिद्ध शक्तिपीठ आहे.



बांगलादेशातील देवीचे शक्तीपीठ


बांगलादेशातही देवीची सर्वाधिक 5 शक्तीपीठे आहेत.


उग्रतारा शक्तीपीठ- बांगलादेशातील सुनंदा नदीच्या काठावर असलेल्या उग्रतारा शक्तीपीठात माता सतीचे नाक पडले होते.
अपर्णा शक्तीपीठ - बांगलादेशातील दुसरे शक्तीपीठ, भवानीपूर गावात आहे, येथे मातेच्या डाव्या पायाचा घोटा पडला होता.
चट्टल भवानी - बांगलादेशातील चितगाव जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात सती मातेचा उजवा हात पडला होता.
यशोरेश्वरी माता शक्तीपीठ - बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात माँ सतीच्या डाव्या तळहाताचा भाग पडला होता.
जयंती शक्तीपीठ - बांगलादेशातील सिल्हेत जिल्ह्यात आईच्या डाव्या मांडीचा भाग पडला होता.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : वेंकटरमणा गोविंदा! तिरुपती बालाजी दर्शनासाठी प्लॅन करताय? भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त 3 पॅकेज एकदा पाहाच...