Indian Railway Travel: आता दिवाळीचा (Diwali 2024) सण अगदी तोंडावर आहे. नोकरी, शिक्षण किंवा इतर कामांमुळे आपल्या घरापासून दूर राहत असलेल्या लोकांना सणानिमित्त आपल्या घरी जायचं असतं. पण त्यासाठी अनेक लोक भारतीय रेल्वेचा पर्याय स्वीकारतात, कारण हा प्रवास आरामदायी तसेच स्वस्त आहे. त्यामुळे लोकांना प्रवास करायला आवडते. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्यात प्रवाशांना अनेकदा अडचणी येतात. एखादा सण आला, तर तिकीट मिळणे आणखी कठीण होऊन बसते. त्यामुळे लोक 3 ते 4 महिने आधीच बुकिंग करतात. पण आता तुम्ही हे करू शकणार नाही. कारण अॅडव्हांस तिकीट बुकिंग प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या... 


भारतीय रेल्वेकडून तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल 


तसं पाहायला गेलं तर भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. परंतु भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी रेल्वेच्या नियमांमध्ये बदल करत असते. काही वेळा हे नियम प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतात, तर कधी त्यांना त्यात काही फायदा होताना दिसत नाही. यावेळी भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल केला आहे. यापूर्वी, प्रवासी 4 महिने आधी म्हणजे 120 दिवस आधीच तिकीट बुक करायचे. त्यामुळे त्यांना कन्फर्म सीट मिळायची, मात्र त्यामुळे 3 ते 4 महिने आधीच वेटिंग लिस्टमध्ये गाड्या येऊ लागल्या. त्यामुळे आता भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल केला आहे. आज आम्ही तुम्हाला तिकीट बुकिंगच्या नियमांबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत. जाणून घ्या...


आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधी तिकीट बुक करा


आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधी तिकीट बुक करता येणार आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. जर तुम्ही 4 महिने अगोदर तिकीट बुक केले असेल तर आता तुम्हाला फक्त 2 महिने वेळ मिळेल. रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, आता तुम्ही पुढील दोन महिन्यांसाठी तिकीट बुक करू शकणार आहात. हा नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. मात्र याचा 31 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही.


रेल्वे मंत्रालयाकडून अधिसूचना जारी 


जर तुम्ही नोव्हेंबरपूर्वी तिकीट बुक केले असेल, ज्यामुळे तुम्ही 3 महिने किंवा 4 महिन्यांत प्रवास करणार असाल तर काळजी करू नका. कारण त्या तिकीट बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. 120 दिवसांपर्यंत बुकिंग करण्याचा नियम 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत लागू राहील, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. पण लक्षात ठेवा की 1 नोव्हेंबरनंतर तुम्ही 4 महिन्यांच्या आत कोणतेही नवीन तिकीट बुक करू शकणार नाही. आता रेल्वे कोणत्याही तारखेला 60 दिवसांत म्हणजे 2 महिन्यांच्या आत तिकीट बुकिंगची सुविधा देत आहे. परदेशी पर्यटकांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांच्यासाठी 365 दिवसांचा कालावधी कायम आहे.


आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंग प्रणालीत का बदल झाला?


4 महिन्यांपूर्वी बुक केलेली तिकिटे सर्वाधिक रद्द होत असल्याचे मानले जात आहे. लोक 4 महिने अगोदर त्यांच्या सीट कन्फर्म करायचे, पण प्रवासाची वेळ जवळ आली की काही कारणास्तव ते रद्द करायचे. प्रवासादरम्यान त्यांना सीट कन्फर्मेशन सुविधा मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तो ट्रेनमध्ये आपली सीट आधीच आरक्षित करत असे. परंतु यामुळे इतर प्रवाशांना तिकीट काढताना समस्या निर्माण झाल्या आणि त्यांना जागा न मिळाल्यास ते इतर गाड्यांचा पर्याय निवडतील. आता रेल्वेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे, त्यामुळे लोकांना या 2 महिन्यांत प्रवास करायचा आहे की नाही हे निश्चित करावे लागेल. त्यामुळे अधिक रेल्वे तिकिटे रद्द होणार नाहीत. तसेच, रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या रिफंडच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही.


 


हेही वाचा>>>


Winter Travel: गोव्याक जातंस..? गर्दीपासून दूर, आजूबाजूची 'ही' ठिकाणं अनेकांना माहित नसावी, पाहाल तर परदेश विसराल!


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )