Hidden Hill Station : उन्हाळ्याची सुट्टी संपली की लोकांना वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे.. बरोबर ना..! अशात लोकांचे विविध प्लॅन्स बनतात. अशावेळी मग विचार येतो की आपल्याला असं ठिकाण भेटलं जिथे निसर्गसौंदर्याचा आस्वादही घेता येईल, सोबत गर्दीही कमी असेल तर किती बरं होईल, जेणेकरून ही पिकनिक पूर्णपणे एन्जॉय करता येईल. तर मंडळी जर तुमच्याकडे बजेट आणि वेळ अशा दोन्हीही गोष्टी असतील तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ऑफबीट हिल स्टेशन बद्दल सांगणार आहोत. जे फार कमी लोकांना माहित असावं. कारण इथे गेल्यावर तुम्ही तुमचे सर्व टेन्शन विसराल आणि पिकनिक पूर्णपणे एन्जॉय कराल...
धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घ्या..!
ट्रेकिंग.. कॅम्पिंग.. उन्हाळ्याची सुट्टी ते मान्सूनच्या सुट्टीचा विचार आला की, पहिला पर्याय मनात येतो तो म्हणजे हिल स्टेशन्स. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन लोकांना हिल स्टेशनवर जाणे आवडते, जेणेकरून थोडा दिलासा तर मिळतोच, सोबत शहराच्या गजबजाटापासूनही दूर राहता येते. हा विचार केवळ तुम्हालाच नाही तर बहुतेक लोकांच्या मनात येतो. अशात पर्यटक विविध हिल स्टेशनवर पोहोचतात
शिमला-मनाली, मसुरी विसराल..!
सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन्समध्ये शिमला-मनाली, मसुरी आणि धर्मशाला आहेत. जर येथे तुम्हाला सुट्टी घालवायची असेल, तर जास्त ट्रॅफिक आणि गर्दीमुळे येथे तुम्हाला शांतता लाभणार नाही. मात्र भारतात अशी काही लपलेली हिल स्टेशन्स आहेत, जी काश्मीर किंवा शिमला, मनाली पेक्षा कमी नाही, आणि लोकांना त्याच्याबद्दल फारशी माहितीही नाही. फार कमी लोकांना माहीत असेल की मनालीपासून काही किलोमीटर अंतरावर तितकेच सुंदर दृश्य असलेले हिल स्टेशन आहे. जर तुम्हाला शिमला-मनाली आणि मसुरी सारख्या हिल स्टेशनला भेट द्यायची असेल पण गर्दी टाळायची असेल तर तुम्ही भारतातील काही छुपी हिल स्टेशन्स निवडू शकता. येथे तुम्हाला आम्ही काही ऑफबीट हिल स्टेशन्सबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवू शकता.
शांघड गाव - स्वित्झर्लंड प्रमाणे भासेल
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सैंज मध्ये शांघड हे सुंदर गाव वसलंय. या गावाची दृश्ये स्वित्झर्लंडसारखी आहेत. यामुळेच शांघडला कुल्लूचा खज्जियार किंवा भारताचे दुसरे मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटले जाते.
शांघाडमध्ये हिरवीगार झाडं, अप्रतिम पाइन झाडं आणि रंगीबेरंगी छोटी घरं हे दृश्य परदेशी पर्यटनासारखं वाटतं. रायला गावात बरशनगड धबधबा, शांगचूल महादेव मंदिर, शांघर मेडोज आणि लाकडी बुरुज मंदिर आहे, जिथे तुम्ही मनःशांती आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
कसे पोहोचायचे?
तुमच्या शहरातून चंदीगड, अंबाला किंवा जोगिंदर नगर रेल्वे स्टेशन गाठा. येथून तुम्ही मनालीला बाय रोड जाऊ शकता. येथे जाण्यासाठी, मनाली ते सैंज लोकल बसने प्रवास करता येतो. याशिवाय कुल्लू विमानतळावर पोहोचल्यानंतर भंतारहून सैंजपर्यंत बस किंवा टॅक्सी मिळेल.
कनाटल
जर तुम्ही सुंदर हिल स्टेशन शोधत असाल तर तुम्ही उत्तराखंडच्या कनाटल हिल स्टेशनच्या सहलीला जाऊ शकता. येथे मर्यादित पर्यटक येतात, त्यामुळे नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्याबरोबरच, गर्दीपासून दूर आरामशीर वेळ घालवता येतो. कनाटलमध्ये कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करता येते. हे हिल स्टेशन डेहराडूनपासून 78 किमी अंतरावर आहे. मसुरीपासून 38 किमी आणि चंबापासून 12 किमी अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनवर पोहोचणे देखील सोपे आहे.
कसे पोहोचायचे?
कनाटल हिल स्टेशनला भेट देण्यासाठी, तुम्ही डेहराडून रेल्वे स्टेशनवरून बसने प्रवास करू शकता. तुम्ही मसुरी किंवा चंबामध्ये असलात तरीही टॅक्सी किंवा लोकल बस तुम्हाला कनाटलला घेऊन जाऊ शकते.
कलगा गाव
ट्रेकिंगची आवड असेल तर कलगा गावात जा. कलगा-बनबुनी-खीरगंगा ट्रॅक हा एक चांगला पर्याय असू शकतो. 28 किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागू शकतात. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोऱ्यातील पुलगा धरणाजवळ कलगा गाव आणि ट्रॅक आहे.
ट्रेकिंग व्यतिरिक्त टेकडीच्या माथ्यावरून मणिकरण व्हॅलीचे अप्रतिम दृश्य दिसते. सूर्यास्ताचे दृश्य अतिशय सुंदर आहे.
कलगा कसा पोहचायचं?
रस्ता आणि हवाई मार्गाने कुल्लू जिल्ह्यातील भुंतरला पोहोचा. मणिकरण हे विमानतळापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे बसेस किंवा टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. कलगा गाव मणिकरणपासून 10 किमी अंतरावर आहे, जिथून ट्रॅक सुरू होतो.
हेही वाचा>>>
Travel : व्यस्त कामातून घ्या ब्रेक, 'इगतपुरीचे' निसर्गसौंदर्य पाहा, मनःशांतीचा अनुभव येईल, चित्रपटांच्या शूटिंगसाठी पहिली पसंत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )