Shravan 2022 : आजपासून सुरु झाली श्रावण महिन्याला सुरुवात; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व
Shravan 2022 : श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे.
Shravan 2022 : श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण (Shravan 2022) महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. या महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू धर्मीयांची परंपरा आहे. याच श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे.
विविध सणांनी आणि उत्सवांनी परिपूर्ण असलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावणातील दर शुक्रवारी जरा जिवंतिकेचे पूजन केले जाते. यावर्षी पहिला दिवस जरा जिवंतिका पूजनाचा आहे. त्यानंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यंदा नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात.
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते.
श्रावणात महत्वाच्या मान्या जाणाऱ्या सणांमध्ये नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणालाही फार महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.
या व्यतिरिक्त श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. दर सोमवारी श्रावणी सोमवाराला महादेवाचे व्रत केले जाते. मंगळवारी मंगळागौर पूजन, बुधवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारूती पूजन करण्याची प्रथा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : कधीपासून सुरु होतोय श्रावण महिना? 'ही' आहे सणांची यादी
- Nag Panchami 2022 : यंदाची नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व