नाशिक : श्रावण महिन्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराला (Trimbakeshwar Jyotirling Mandir) मोठा महत्त्व प्राप्त होतं. दर्शनासाठी हजारो भावी त्र्यंबक नगरीत दाखल होत असतात. दर्शनाबरोबरच येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Brahmagiri) महत्त्वाची मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर भाविक दर्शनासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा देखील पूर्ण करत असतात, पण नेमकी ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण कशी करावी कोणत्या मार्गाने करावी हे देखील महत्त्वाचं आहे.


नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक भक्त येत असतात श्रावण महिन्यातील चारही सोमवारी अनेक भावी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जात असतात. पहाटेपासूनच या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. सुरुवातीला महत्त्वपूर्ण असलेल्या कुशावर्त तीर्थात स्नान केलं जातं आणि यानंतर खऱ्या अर्थाने ब्रह्मगिरी प्रदक्षिणाला सुरुवात होते. अनेक भाविक रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात करतात. ही फेरी साधारण 20 किलोमीटर, 40 किलोमीटरची अशा दोन मार्गाने असल्याचे भाविक सांगतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. 


पहाटेपासून प्रदक्षिणेला सुरुवात


श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी किंवा सोमवारी पहाटे या प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. ब्रह्मगिरी फेरीची सुरुवात त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध असलेल्या कुशावर्त तीर्थापासून होते. या ठिकाणी स्नान करुन प्रदक्षिणेला सुरुवात करतात. तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या दिशेने भाविक चालू लागतात. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किलोमीटरचे अंतर पार केल्यावर पेगलवाडी फाट्याजवळ उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते. या प्रयागतीर्थ कुंडाला फेरी मारुन भाविक घोटी मार्गाने पहिनेच्या दिशेने चालू लागतात. पावसाळ्यात ही फेरी होत असल्याने आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत भाविक अनवाणी पायाने अंतर कापत असतात. 


अन् पहिला टप्पा पार होतो...


प्रसिद्ध असलेल्या पहिने या निसर्गरम्य परिसरातून जात असताना साधारण तासाभराच्या अवधीनंतर उजवीकडे जाणारा रस्ता लागतो. एक रस्ता घोटीकडे तर दुसरा रस्ता खोडाळाकडे जात असतो. बाजूलाच भिलमाळ नावाचा छोटासा पाडाही लागतो. या परिसरात अनेक भाविक भक्त काही काळ विश्रांती देखील घेत असतात. भिलमाळ हे गाव सोडल्यानंतर काही अंतरावर धाडोशी हे गाव लागते. येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर मुख्य रास्ता सोडून उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याने पुढे जावे लागते. पूर्वी हा रास्ता शेतातून जात होता. त्यावेळी भाविकांना चालणेही मुश्कील व्हायचे. स्थानिक शेतकऱ्यांची भीती असल्याने भाविकांकडून ती तुडवली जात असत. म्हणूनच आता स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटचा रस्ता म्हणजेच फेरी मार्ग बनवण्यात आला आहे. हाच सिमेंटचा रस्ता पार करत असताना घाट सदृश्य चढण दिसते. हा घाट उतरत असताना या ठिकाणी गौतम ऋषी यांचे मंदिर असून भाविक येथील दर्शन घेतल्यानंतर पुढे मार्गक्रमण करत असतात. इथे आल्यानंतर एक पहिला टप्पा पार झाल्याचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते.


पुढचा मार्ग खडतर होतो...


दरम्यान गौतम ऋषींचे दर्शन घेतल्यानंतर यानंतरचा मार्ग अगदी खडतर होत जातो. निसरडे रस्ते, चिखल माती, त्यामुळे डोंगर उतरताना सांभाळून उतरावे लागते. तासाभराचे अंतर पार केले की, पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून जातो. शेतीची कामे सुरु असल्याचे दिसते. परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी मंदिरेही रस्त्यात लागतात. याचबरोबर निसर्गाचा आनंद घेत, फोटो घेत, कुणी सेल्फी घेत पुढे मार्गक्रमण करत असतात.


ब्रह्मगिरी प्रदक्षिणा...एक आनंददायी प्रवास


दरम्यान शेवटच्या टप्प्यात भाविक तळेगाव-सापगाव गावाजवळ येत असतात. हाच त्र्यंबकेश्वर जव्हार मार्ग म्हणूनही ओळखला जातो. इथे आल्यानंतर आता काहीच अंतर शिल्लक राहिलेले असते. यावेळी भाविक मुख्य रस्त्याला लागून गौतमबारी, मग हळूहळू त्र्यंबकेश्वर शहर दिसू लागते. तसेतसे चालण्याची उर्मी वाढत जाते. गौतमबारीपासून अर्धा तासाचे अंतर पार करुन गेले की आपण पुन्हा त्र्यंबकेश्वर दाखल होतो आणि प्रदक्षिणा पूर्ण होते. एकूणच श्रावणात मोठ्या प्रमाणावर भाविक या ब्रह्मागिरी फेरीसाठी येत असतात. रोजच्या धावपळीतून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाता येते. त्यामुळे असं म्हटलं जात की, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक आनंददायी प्रवास आहे. विशेष म्हणजे श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अगदी वेगळा आहे.


हेही वाचा


आज नागपंचमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि या दिनाचं महत्त्व