मुंबई : दहिहंडी (Dahihandi) उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते, त्यामुळेच गोकुळ अष्टमीला दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे नुकतंच एक परिपत्रक जारी करुन राज्यातील 50 हजार गोविंदांना विम्याचं कवच देण्यात आलं आहे. 50 हजार गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी 37 लाख 50 हजार देण्यात आले आहेत. तर राज्य सरकारने ठरवल्याप्रमाणे यंदापासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धाही होणार आहे.
प्रो-गोविंदा स्पर्धा 31 ऑगस्टला
2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये "प्रो-गोविंदा" स्पर्धेचं आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.
50 हजार गोविंदांना मिळणार विमा कवच
दहिहंडी उत्सवादरम्यान गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं. या अनुषंगाने गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु. 75 चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु. 37,50,000 इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यात आला आहे. मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.
उदय सामंत यांच्याकडून अर्थसहाय्य
उद्योग मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रातील ठाणे आणि मुंबईच्या औद्योगिक विकास महामंडळद्वारे आठ थराच्या आणि नऊ थराच्या गोविंदा पथकाला आर्थिक सहाय्य करणार आहेत. आर्थिक सहाय्यासाठी 1 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहेत.
दीपक केसरकर यांच्याकडून अर्थ सहाय्य
जिल्हा नियोजन समिती मुंबई शहरांमार्फत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून नाविन्यपूर्ण योजनेमधून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रो-गोविंदा स्पर्धेला होणार सुरुवात
दहीहंडी हा आपला पारंपारिक मराठी उत्सव असून आज या उत्सवाचं स्वरूप हे साहसी खेळ म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे. प्रो-गोविंदाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू तयार होतील. या माध्यमातून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचं नाव लौकिक करतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: